” जर आताच यांना रोखले नाही तर हे सहकार क्षेत्र गिळतील व तुमच्या साखरेला उद्या अमित शहांच्या मुंग्या लागतील, असं म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपला फटकारले आहे. आज नेवासा येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार शंकरराव यशवंतराव गडाख यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत ते बोलत होते.
”केंद्रात कधीही सहकार खातं नव्हतं. मात्र या दोन वर्षात केंद्रात सहकार खाते निर्माण करण्यात आले आणि हे खातं अमित शहा यांनी आपल्याकडे ठेवलं आहे. मात्र हे खातं वेगळं निर्माण करण्याची गरज का भासली? त्यांना हे खातं स्वतःकडे ठेवण्याची गरज का भासली? याचे कारण म्हणजे यांना सहकार क्षेत्र गिळायचं आहे. सहकार क्षेत्र महाराष्ट्रातून सुरू झालं असून आपलं राज्य सहकार क्षेत्रात पुढे आहे. यानंतर गुजरातही यात आला. यातच अशी माहिती समोर आली आहे की, केंद्रात सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली आहे. याद्वारे सहकार क्षेत्रात काय बदल करता येईल, कोणते असे कायदे करता येतील, जेणेकरून जिथे-जिथे सहकार क्षेत्र आहे, ज्यात सहकारी कारखाने, बँका असतील, ते केंद्र आपल्या ताब्यात घेऊ शकेल. म्हणजेच तुमच्या साखरेला उद्या अमित शहांच्या मुंग्या लागणार आहेत”, असं ते म्हणाले.
”माझ्याकडे सत्ता नाही. त्यांनी पक्ष आणि चिन्ह चोरलं. त्यांना वाटलं उद्धव ठाकरे संपला. मात्र अजूनही त्यांना प्रत्येक ठिकाणी माझा उद्धार करावा लागत आहे, मला आव्हान द्यावं लागत आहे. यात माझा नाही तुमचा विजय (जनतेचा) आहे. माझी अशी इच्छा आहे की, रोज मोदी आणि शहा यांनी महाराष्ट्रात यावं आणि भरभरून माझ्याबद्दल बोलावं. म्हणजे संध्याकाळी मला त्यांना उत्तर देता येईल”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
”आज सभेसाठी श्रीगोंदाला गेलो होतो. तिथे बॅग तपासायला लोकं उभे होते, आता येथे आलो, येथेही बॅग तपासायला लोक उभे होते. असं म्हणतात, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. तसाच मी जेथे जातो तिथे निवडणूक आयोग माझा सांगाती आहे. माझा त्यानं इतकंच सांगणं आहे की, माझ्या सांगाती आलात ठीक आहे. मात्र चुकीची संगत पकडू नका, नाही तर तुमचं आयुष्य वाईट होईल. निवडणूक आयोगाला माझा नेहमीचाच एक प्रश्न आहे, मोदींची बॅग तपासली का? त्यावेळी त्यांनी मला हळूच सांगितलं, साहेब आम्हाला अडचणीत नका आणू. यावर मी त्यांना विचारलं का? तर ते म्हणाले, बॅगेतून पैशांची ने- आण होते की नाही, हे पाहणं आमची जबाबदारी आहे. मोदींच्या बॅगेत आश्वासनांच्या थापा असतील तर त्या कशा पकडायच्या असं त्यांना वाटलं असेल. यावर मी त्यांना म्हणालो, तुम्ही काळजी करू नका, ही जनता समर्थ असून मोदींच्या आश्वासनांच्या थापांचा निकाल लावायला महाराष्ट्र आसुसलेला आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. मोदी आणि शहा हे महाराष्ट्रचं भलं करू शकत नाही. हे दुर्दैवाने आता निवडून आले असून वरती दिल्लीत बसले आहेत. यावेळी भाजपचं शेपटावर निभावलं. आता पुन्हा लोकसभेची निवडून झाली, तर यांचं शेपूटही महाराष्ट्र कापून टाकल्याशिवाय राहणार नाही, असंही ते म्हणाले.
मुंबईची तिजोरी हे महायुती सरकार लुटत आहे. राज्याची तिजोरी यांनी खाली केली. पुढील महिन्यातील जी कर्ज घेण्याची मुभा होती, ती यांनी याच महिन्यात वापरून कर्मचाऱ्यांना पगार दिले आहेत. अशाने राज्याचं काय होणार? महाराष्ट्रात यांची बेफाम लूट सुरू आहे. मुंबईत आणि राज्यात यांनी नको तिथे रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले आहेत. यावर आम्ही काही बोललो तर आम्ही विकासाच्या आड येत असल्याचा आरोप हे करतात. आम्ही विकासाच्या आड आलो नाही, येणारही नाही. मात्र आमच सरकार आल्यानंतर तुम्ही जी महाराष्ट्राची लूट करून गुजरातच्या घशात घालत आहात, ही लूट मी बंद करून दाखवणार, असं उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारला ठणकावून सांगितलं.