अमेरिकेतील नोकऱ्या जाणार की राहणार; केंद्र सरकार अलर्ट मोडवर, माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने कंपन्यांना विचारली परिस्थिती साधला संवाद

अमेरिकेतील हिंदुस्थानींच्या नोकऱ्या संकटात सापडल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेत हिंदुस्थानींसाठीच्या एच वन बी व्हीसाला होत असलेल्या विरोधानंतर केंद्र सरकार अलर्ट मोडवर गेली आहे. परराष्ट्र मंत्रालय, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालय तसेच वाणिज्य विभागाने अमेरिकेत वैधरित्या काम करणाऱ्या हिंदुस्थानींच्या सध्या स्थितीबाबत अमेरिकेतील कंपन्यांशी संवाद साधला असून तेथील परिस्थिती जाणून घेतली आहे. हिंदुस्थानातील प्रोफेशनल्सना अमेरिकेत राहाण्यासाठी कोणत्याही अडचणी येऊ नयेत यादृष्टीने काम करावे लागेल असे सरकारमधील सुत्रांनी म्हटले आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्रालय सॉफ्टवेअर इंजिनीयर्सच्या नोकऱ्यांबाबत मोठय़ा आयटी कंपन्यांशी संपर्क साधून तेथील परिस्थिती जाणून घेत असल्याचे चित्र आहे.

एच वन बी हा नॉन इमिग्रंट व्हिसा आहे. अमेरिकन कंपन्यांना विशेष तांत्रिक कौशल्ये असलेल्या पदांसाठी परदेशी व्यावसायिकांना नियुक्त करण्याची परवानगी हा व्हिसा देतो.

आयटी व्यावसायिक, आर्किटेक्चर, आरोग्य व्यावसायिक यांना हा व्हिसा मिळतो. ज्या व्यावसायिकांना नोकरीची ऑफर दिली जाते त्यांनाचा हा व्हिसा मिळू शकतो. हे पूर्णपणे नियुक्ती करणाऱ्या कंपनीवर अवलंबून आहे.