जीबीएस रोखण्यासाठी यात्रा, जत्रांवर बंदी घालणार; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा इशारा

गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) आजाराचे रुग्ण वारंवार सापडू लागल्याने आरोग्य यंत्रणेची धावपळ सुरू झाली आहे. या आजाराचा संसर्ग रोखणे हे आरोग्य विभागासमोर आव्हान बनले आहे. केंद्र सरकारनेही याची गंभीर दखल घेतली आहे. जीबीएसचा संसर्ग रोखण्यासाठी यात्रा आणि जत्रांवर बंदी घालण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज दिला.

दूषित पाणी, अर्धवट शिजवलेले अन्न, पाश्चराईज्ड न केलेले दुग्धजन्य पदार्थ यांचे सेवन केल्यामुळे या आजाराची लागण होत असल्याची आतापर्यंतची माहिती आहे. परंतु त्याबाबतीत उपाययोजना हाती घेतल्यानंतरही जीबीएसचे रुग्ण अनेक जिह्यांमध्ये आढळू लागल्याने सतर्प होण्याची गरज आहे. या आजाराचा संसर्ग गर्दीमुळे होत असेल तर राज्यातील यात्रा आणि जत्रांवर बंदी घालावी लागेल, असे आरोग्य राज्यमंत्री जाधव म्हणाले. त्यासंदर्भात वैद्यकीय अधिकारी आणि प्रशासनाची बैठक तातडीने बोलवून पुढील उपाययोजना निश्चित केल्या जातील असे त्यांनी सांगितले. सुरुवातीला पुणे जिल्ह्यात जीबीएसचे रुग्ण आढळले होते. आता त्याचा प्रादुर्भाव राज्याच्या अन्य जिह्यांमध्येही होऊ लागला आहे. आतापर्यंत राज्यात आठ नागरिकांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे, तर अनेक रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.