चांद्रयान-5 मोहिमेला केंद्राची मान्यता; ‘इस्रो’ करणार चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास

हिंदुस्थानी अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणार आहे. यासाठी इस्रो चांद्रयान-5 मोहीम राबवणार आहे. नुकतीच या मोहिमेला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे, अशी माहिती इस्रोचे नवीन अध्यक्ष व्ही. नारायण यांनी दिली. इस्रो प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ते बंगळुरू येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.

फक्त तीन दिवसांपूर्वीच आम्हाला चांद्रयान-5 मोहिमेला मंजुरी मिळाली. यामध्ये जपान आमचा मित्र असेल. चांद्रयान-3 मोहिमेत 25 किलो वजनाचा रोव्हर (प्रज्ञान) होता, तर चांद्रयान-5 मोहिमेत चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी 250 किलो वजनाचा रोव्हर असेल, असे ते म्हणाले. 2027 मध्ये सुरू होणाऱ्या चांद्रयान-4 मोहिमेचे उद्दिष्ट चंद्रावरील मातीचे नमुने आणणे आहे. गगनयानसह अनेक मोहिमांव्यतिरिक्त अंतराळात भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक स्थापन करण्याच्या योजना सुरू आहेत, असे नारायणन म्हणाले.

इस्रोच्या भविष्यातील योजना

2025 मध्ये 3 सदस्यांचे एक क्रू गगनयान 3 दिवसांच्या मोहिमेसाठी पृथ्वीच्या 400 किमी वरच्या कक्षेत पाठवले जाईल.

हिंदुस्थानी अंतराळ स्थानकाचे प्रक्षेपण केले जाणार आहे. यासाठी भारताच्या अंतराळ स्थानकात 5 मॉडय़ूल असतील. पहिले मॉडय़ूल 2028 मध्ये लाँच केले जाईल. यासाठीचे डिझाइनचे काम पूर्ण झाले आहे आणि अहवाल सरकारकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. हे स्टेशन अंतराळातील अंतराळवीरांचे घर असेल.

हिंदुस्थानी अंतराळवीरांना चंद्रावर पाठवले जाणार आहे. इस्रो 2040 पर्यंत चंद्रावर अंतराळवीर पाठवण्यावर काम करत आहे. सध्या अमेरिका हा एकमेव देश आहे ज्याने मानवांना चंद्रावर पाठवले आहे. चीन 2030 पर्यंत चंद्रावर आपले अंतराळवीर पाठवण्यावरही काम करत आहे.

 चांद्रयान-4 मोहिमेला आधीच मान्यता

चांद्रयान-3 मोहीम यशस्वी झाल्यानंतर चांद्रयान-4 मोहिमेला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. या मोहिमेचा उद्देश चंद्रावर अंतराळयान उतरवणे, चंद्राच्या मातीचे आणि खडकांचे नमुने गोळा करणे व ते सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणणे आहे. या मोहिमेसाठी 2104 कोटी रुपये खर्च येईल.