हातभर तक्रारींचा बोटभर उपाय! मतदार जनजागृती कार्यक्रमाचा शुभारंभ

महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पात्र मतदारांनी मतदान करावे यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र आणि मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या उपक्रमाचा आज गेट वे ऑफ इंडिया येथे दिमाखदार कार्यक्रमात शुभारंभ करण्यात आला. या वेळी सिने क्षेत्र, संगीत क्षेत्रासह पोलीस, रॅपरसह नामांकित व्यक्तींनी मतदारांना सर्वांनी मतदान करावे, असे आवाहन केले. ‘हातभर तक्रारींचा, बोटभर उपाय’ अशा टॅगलाईनखाली उत्सव निवडणुकीचा अभिमान महाराष्ट्राचा उपक्रम सुरू करण्यात आला.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी होणाऱया मतदानाची उत्सुकता सर्वांना लागली आहे. मतदानाच्या दिवशी सर्व आस्थापनांना सुट्टी देण्याचे आदेशही प्रशासनाकडून देण्यात आले आहे. मात्र या दिवशी अनेक मतदार सुट्टी एन्जॉय करीत मतदानाचा हक्क निभावत नाहीत. या पार्श्वभूमीवर हा मतदार जनजागृती उपक्रम सुरू करण्यात आला आहे. 11 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत हा ‘स्वीप’ मतदार जागृती कार्यक्रम पार पडणार आहे. या वेळी पालिका आयुक्त तथा मुंबईचे जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोकलिंगम, उपनगर जिह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, सहपोलीस आयुक्त अनिल पुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीत दाहिया, अभिनेता पद्मश्री मनोज जोशी, अभिनेत्री वर्षा उसगावकर, अनन्या पांडे, हास्य अभिनेता अली अजगर, भारती सिंग, सोनाली खरे, दिग्दर्शक रोहित शेट्टी, क्रिकेटर अजिंक्य रहाणे, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, अभिजित बांगर, अमित सैनी आदी उपस्थित होते.

खरेदीवर 20 टक्के सूट, सिनेमाचे तिकीट मोफत

महाराष्ट्रात रियालन्स रिटेल आणि हॉटेलमध्ये मतदान केलेल्यांना 20 ते 25 टक्के सूट देण्यात येणार आहे. तर सिनेमाच्या एका तिकिटावर एक तिकीटही देण्यात येणार असल्याचे या वेळी जाहीर करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व दिग्गज सेलिब्रिटी-मान्यवरांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. या वेळी गाणी, नृत्य, रॅपर गाणीही सादर करून मतदान जागृती करण्यात आली. मतदान कसे करावे, कोणती खबरदारी घ्यावी, योग्य मतदान कसे करावे यासाठी मतदान जागृती करणाऱया वाहनाचेही लोकार्पणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.