राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती, कोल्हापूर ‘शाहूमय’; सरकारची उदासीनता

आरक्षणाचे जनक व सामाजिक न्याय क्रांतीचे प्रणेते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज (दि. 26) शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती साजरी होत आहे. यानिमित्त सहा दिवस जिल्हा प्रशासन तसेच विविध सामाजिक संस्था आणि संघटनांकडून भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ऐतिहासिक शाहू जन्मस्थळ तसेच दसरा चौक येथील छत्रपती शाहूंच्या पुतळ्याला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याने वातावरण ‘शाहूमय’ झाले आहे.

दरम्यान, 2022 मध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर महानिर्वाण दिनानिमित्त तत्कालीन महाविकास आघाडी तसेच जिल्हा प्रशासनाकडून ऋतज्ञता पर्वातून अभिवादन करण्यात आले. गेल्यावर्षी सांगताही करण्यात आली. मात्र, राजर्षी शाहू महाराज यांच्या यंदा 150व्या जयंतीदिनाच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारकडून अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. राज्य शासनाच्या पातळीवर यासंदर्भात कोणत्याही कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती उत्सवाचे नियोजन करण्यासाठी स्थानिक पातळीवर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली राजर्षी छत्रपती शाहू महाराज शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती महोत्सव समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून कोल्हापूर जिह्यात वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच दि. 25 ते 30 जून या कालावधीत होणाऱया भरगच्च कार्यक्रमांमध्ये जिह्यातील सर्व तालुका ठिकाणी ‘शाहू विचार जागर’ हा कार्यक्रम होणार आहे.

सकाळी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला कसबा बावडा येथील शाहू जन्मस्थळ आणि दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहेत. यावेळी पोलीस बॅण्डकडून मानवंदना देण्यात येणार आहे. तसेच सर्व ग्रामपंचायती, नगरपालिका, महापालिका या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. शहरात दसरा चौक, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, कोल्हापूर मनपा, शाहू समाधी स्थळ या मार्गावर भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यात सर्व खेळाडू, पैलवान, सर्व विद्यार्थी, महाविद्यालयीन तसेच शालेय विद्यार्थी सहभागी होणार आहेत. सर्व तालुका स्तरावर स्वतंत्र शोभायात्रा होणार आहे. तसेच जिह्यात सर्व ठिकाणी ‘शाहू विचारांवर आधारित 150 व्याख्याने शिवाजी विद्यापीठांतर्गत विविध महाविद्यालयात होणार आहेत.’

गुरुवारी (27 रोजी)  राधानगरी येथे ‘राजर्षी शाहू आणि सिंचन’ हा परिसंवाद आणि माणगाव (ता. हातकणंगले) येथे ‘समाज, अभियांत्रिकी आणि राजर्षी शाहू’ हा परिसंवाद होणार आहे. शुक्रवारी (28 रोजी) पंचतारांकित औद्योगिक वसाहत, कागल येथे ‘उद्योगापुढील आव्हाने आणि वातावरण बदल’ वारणानगर येथे ‘राजर्षी शाहू कृषी विकास’, आंबा (ता. शाहूवाडी) येथे ‘जंगल रक्षण व राजर्षी शाहू’ हा परिसंवाद पार पडणार आहे. शनिवारी (29 रोजी) इचलकरंजीतील डी.के.टी.ई. कॉलेज येथे ‘आरोग्याचे प्रश्न तसेच वस्त्र्ााsद्योगापुढील आव्हाने’ हा परिसंवाद होणार आहे.

रविवारी (30 रोजी) ‘महिला बचत गट मेळावा’, इचलकरंजी येथे ‘कामगार मेळावा’, तर मौनी विद्यापीठ गडहिंग्लज येथे ‘शेतकरी-कामगार मेळावा’ होणार आहे; तसेच प्रसन्न मालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे स्टेशन-कलेक्टर ऑफिस, दसरा चौक, सायन्स कॉलेज, वैदिक शाळा, केशवराव भोसले नाट्यगृह, शाहू समाधी स्थळ, न्यू पॅलेस, शाहू जन्मस्थळ या मार्गावर हेरिटेज वॉक घेण्यात येणार आहे.