
‘गुढीपाडवा.. प्रेम वाढवा.. नववर्षाचा हा संदेश स्नेह जागवा’ असे म्हणत आज ठाणे, रायगड व पालघर जिह्यांत अभूतपूर्व जल्लोषात स्वागत यात्रा निघाल्या. हातात भगवे ध्वज घेऊन हजारोंच्या संख्येने युवक व युवती या स्वागत यात्रांमध्ये सहभागी झाले होते. ढोलताशांच्या निनादात त्यांच्या उत्साहाचा सूर टिपेला पोहोचला होता. पर्यावरणासह शिक्षण, आरोग्य, विज्ञान, कृषी, तंत्रज्ञान अशा विविध विषयांवरील चित्ररथ प्रेरणादायी ठरले. दांडपट्टा आणि तलवारबाजीने स्वागत यात्रेमधील सर्वांचे रक्त सळसळले. नऊवारी साडी नेसून पारंपरिक वेषात आलेल्या महिलांचे लेझिम पथकही सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. कल्याण, डोंबिवली, अलिबाग, मुरुड, उरण, रोहा, वसई, विरार येथेही दणक्यात स्वागतयात्रा निघाल्या.
डोंबिवली पूर्वेतील प्रसिद्ध गणेश मंदिरात पहाटे नववर्षानिमित्त महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी गणेश पूजन केले. तसेच गुढी उभारण्यात आली. त्यानंतर ढोलताशांच्या गजरात स्वागत यात्रेचा शुभारंभ झाला. फडके रोडवर तुफान गर्दी झाली होती. लहान मुलांपासून ते आजीआजोबांपर्यंत सर्वच एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत होते. पंडित दीनदयाळ रस्त्यावर मुस्लिम बांधवांतर्फे यात्रेत सहभागी झालेल्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात येत होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांचेदेखील मुस्लिमांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. यानिमित्ताने सामाजिक व धार्मिक एकतेचा संदेश देण्यात आला.
डोंबिवलीच्या स्वागत यात्रेत कलाकार समीर चौगुले, वनिता खरात, ओमकार राऊत, पृथ्विक प्रताप, प्रथमेश शिवलकर, प्रियदर्शिनी इंदलकर, विराज जगताप उपस्थित होते.
ठाण्यात कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीने शहरातील विविध भागांतून अभूतपूर्व उत्साहात स्वागत यात्रा काढण्यात आली. उपवन व मासुंदा तलाव गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला दिव्यांनी उजळून गेला होता. तसेच महाआरतीदेखील करण्यात आली.
जांभळीनाका येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीच्या वतीने भव्य रांगोळी काढून दीपोत्सव साजरा करण्यात आला. धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरपुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.