वानखेडे स्टेडियमचा सुवर्ण महोत्सवी सोहळा क्रिकेटच्या दिग्गजांच्या सोनेरी आठवणींनी संस्मरणीय ठरला. वानखेडेवर नेहमीच षटकार-चौकारांची आतषबाजी पाहायला मिळायची, पण आज सचिन तेंडुलकरसह सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री, अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्माने आपल्या आठवणींच्या फटकेबाजीने अवघे स्टेडियम दणाणून सोडले.
मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) वतीने रविवारी वानखेडे स्टेडियमचा सुवर्ण महोत्सव ‘न भूतो न भविष्यति’ असा साजरा केला. यावेळी, मुंबईचे क्रिकेट गाजवणाऱया दिग्गजांनी वानखेडे स्टेडियमच्या आपल्या आठवणी ताज्या करत उपस्थित चाहत्यांचे मनमुराद मनोरंजन केले. एमसीएने यावेळी मुंबईसह हिंदुस्थानी संघाचेही नेतृत्व केलेल्या सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्राr, डायना एडुल्जी, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या मुंबईकर कर्णधारांचा विशेष सन्मान केला.
मुंबई क्रिकेटचे अध्यक्षपद भूषवणाऱया शरद पवार यांनी वानखेडेची आठवण ताजी करताना सांगितले, ‘1970 च्या दशकात मी क्रीडामंत्री असताना वानखेडे यांनी चर्चगेट परिसरात स्टेडियम बांधण्याची इच्छा व्यक्त केली होती. ही गोष्ट मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकल्यानंतरच या स्टेडियमच्या उभारणीला बळ मिळाल्याचे त्यांनी सांगितले.’ तसेच सुनील गावसकर 1974 साली वानखेडे स्टेडियमवर खेळले होते. त्या गोष्टीला पन्नास वर्षे झाली आणि गावसकरांनीही आपल्या वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केल्याबद्दल केक कापून त्यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला. या सोहळय़ात रोहित शर्माच्या मुलाखतीवेळी अवघे वानखेडे ‘रोहित- रोहित’च्या घोषणांनी दणाणले होते.
आयुष्यातील सर्वोच्च क्षण वानखेडेवर साकार -सचिन
1983 सालच्या विश्वचषकापासून मी खूप प्रेरित झालो आणि माझ्या हातात बॅट विसावली. दिग्गज खेळाडूंना विश्वचषक उंचावताना पाहून आपणही असा चषक पकडावा, असे स्वप्न मी पाहिले. माझ्या आयुष्यातील सर्वोच्च क्षण याच वानखेडेवर साकार झाला. जगज्जेतेपदाचे स्वप्न साकार झाले. त्यामुळे 2011 साली वानखेडे स्टेडियमवर पटकावलेले विश्वविजेतेपद माझ्यासाठी खूप स्पेशल आठवण असल्याची भावना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने बोलून दाखवली.
वानखेडेवरच्या आठवणी ताज्या करताना सचिन म्हणाला, ‘वानखेडे स्टेडियम मी वयाच्या दहाव्या वर्षी पाहिले होते. त्यावेळी मला माझ्या साहित्य सहवासमधील मित्रांनी लपवून आणले होते. हे स्टेडियम पाहताक्षणी मी प्रभावित झालो आणि तेव्हा येथे खेळण्याचे ठरविले होते. तिथून माझा क्रिकेट प्रवास सुरू झाला. 1983 सालच्या विश्वचषकाच्या विजयाने मी खूप प्रेरित झालो होतो. 1996 साली हिंदुस्थानात आणि 2003 साली दक्षिण आफ्रिकेत विश्वविजेतेपद अगदी जवळ आले होते; पण अखेर हे स्वप्नही 2011 साली माझ्या घरी वानखेडे स्टेडियमवरच पूर्ण झाले. हा माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठा क्षण होता.’
लेझर शो आणि अजय-अतुलचा झिंगाट
वानखेडेच्या सुवर्ण महोत्सवी सोहळय़ाला खऱया अर्थाने नेत्रदीपक केले ते अद्वितीय अशा लेझर शोने. डोळय़ांचे पारणे फेडणारा हा लेझर शो पाहून हाऊसफुल्ल गर्दी करणाऱया मुंबईकर क्रिकेटप्रेमींनी दिलखुलास दाद दिली. तसेच अजय-अतुलने सादर केलेल्या सांगीतिक कार्यक्रमानेही या सोहळय़ाला सर्वोच्च उंची गाठून दिली.कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी सादर केलेल्या ‘झिंगाट’ गाण्याने अवघे स्टेडियम नाचले आणि वानखेडे स्टेडियमचा सुवर्ण महोत्सव सोहळय़ाची सोनेरी सांगता झाली.