
कोकणच्या मातीत आणि माणसांत रमलेले लेखक म्हणजे मधु मंगेश कर्णिक ऊर्फ मधुभाई. मागील 75 वर्षे सळसळत्या ऊर्जेने, चैतन्याने लेखन करून साहित्यप्रेमींच्या मनात घर करणारे मधुभाई आजही लिहिते आहेत. वयाच्या 95व्या वर्षी त्यांची पाच पुस्तकं प्रकाशित झाली. वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांची ‘पुस्तकतुला’ करण्यात आली. या प्रेमाने मधुभाई भारावले. ‘मी आयुष्यभर शब्दांशी खेळलो, पण आज तुमचे आभार मानायला शब्द नाहीत. हा माझा शेवटचा नमस्कार, असे भावपूर्ण उद्गार त्यांनी काढले आणि उपस्थितांचे डोळे पाणावले. करुळचा मुलगा शतायुषी होवो, अशा भावना प्रत्येकाच्या हृदयातून उमटल्या.
मधु मंगेश कर्णिक वयाची 95 वर्षे पूर्ण करत आहेत. यानिमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषदेने प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीत (कोमसाप) विशेष सोहळय़ाचे आयोजन केले. या कार्यक्रमात कर्णिक यांनी लिहिलेल्या पाच पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. त्यांची ‘स्मृतिजागर’, ‘गूढ-निगूढ’, ‘स्वयंभू’, ‘राजा थिबा’ व ‘उधाण’ ही पाच पुस्तके प्रकाशित झाली.
सत्काराला उत्तर देताना मधुभाई भावुक झाले. ते म्हणाले, माझी 75 वर्षांत 80 पुस्तके प्रकाशित झाली. यातील किती पुस्तके काळाच्या ओघात राहतील माहीत नाही. काळ पुढे जात असतो. लेखक मागे राहतो; पण कोमसाप आणि मालगुंडचे पुस्तकाचे गाव या दोन अजर देणग्या मी महाराष्ट्राला दिल्या. आता सगळी कामं झाली आहेत. जगण्याचं सगळं प्रयोजन संपलं आहे. हा माझा शेवटचा नमस्कार, असे मधुभाई म्हणाले.
त्याआधी मधुभाईंचे औक्षण आणि ‘पुस्तकतुला’ करण्यात आली. पुस्तकतुलेची पुस्तके मालगुंड येथे नुकत्याच सुरू झालेल्या पुस्तकाच्या गावाला भेट देण्यात येणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठापूर होते. यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर, राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत, सांस्पृतिक कार्यमंत्री आशीष शेलार, कोमसापचे विश्वस्त रमेश कीर, अध्यक्ष नमिता कीर, केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, मुंबई जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज वराडे, दादर शाखा अध्यक्ष विद्या प्रभू उपस्थित होते.
कोमसापने कोकणातील बोलीभाषा कोश आणि लेखकांची सूची तयार करण्याचे काम सुरू केले आहे. या कामासाठी अध्यासन द्यावे अशी मागणी कोमसापच्या वतीने सरकारकडे करण्यात आली. याला सकारात्मक प्रतिसाद देत ‘पद्मश्री मधु मंगेश कर्णिक बोलीभाषा अध्यासन केंद्र’ सुरू करण्यात येईल, अशी घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केली.