अखेर ‘रँचो’च्या शाळेला सीबीएसईची मान्यता, जम्मू-कश्मीर राज्य शिक्षण मंडळाने दिली एनओसी

‘थ्री इडियट’ या सिनेमामध्ये दाखवण्यात आलेल्या लडाखच्या लोकप्रिय शाळेला अखेर सीबीएसईची मान्यता मिळाली. दोन दशकांच्या संघर्षांनंतर सीबीएसईची मान्यता मिळवण्यात शाळेला यश आलंय. लडाखची ड्रक पद्म कार्पो स्कूल असे या शाळेचे नाव आहे. 2009 साली ‘थ्री इडियट’ हा चित्रपट आल्यानंतर ही रँचोची शाळा म्हणून ओळखली जाऊ लागली. या शाळेत मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नावीन्यपूर्ण प्रयोग केले जातात. शाळेचे मुख्याध्यापक मिंगुर अंगमो म्हणाले, सुरुवातीपासूनच आमच्या शाळेतील शिक्षण पारंपरिक शिक्षण पद्धतीपेक्षा वेगळे आहे. मात्र जम्मू-कश्मीर राज्य शिक्षण मंडळाकडून एनओसी मिळत नसल्याने ही प्रक्रिया लांबली. मात्र आता सीबीएससी मान्यतेमुळे प्रत्येक विद्यार्थ्याला उच्च शिक्षणाचा मार्ग सोपा झाला आहे.

सीबीएसईशी संलग्न होण्यासाठी कोणत्याही शाळेला त्या राज्याच्या शिक्षण मंडळाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळवावे लागते. लडाख हा वेगळा केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतरही ड्रक पद्म कार्पो स्कूल अद्यापपर्यंत जम्मू-कश्मीर शिक्षण मंडळाशी संलग्न होती. अनेक वर्षे प्रयत्न करून शाळेला एनओसी मिळालेली नव्हती. आता ही शाळा 10 वीच्या पुढे वाढवायचा शाळा व्यवस्थापनाचा विचार आहे. त्यामुळे 2028 पर्यंत 11 वी आणि 12 वीचे वर्गही सुरू होणार आहेत. ‘थ्री एडियट’ सिनेमातील एका दृश्यात या शाळेची एक भिंत दाखवण्यात आली होती. भिंत पाहायला येणाऱ्या पर्यटकांचा मुलांना त्रास होऊ नये म्हणून 2018 साली भिंतीची जागा बदलण्यात आली.