
अभिनेता सुशांत सिंग राजपुतने आत्महत्याच केली होती, असा क्लोजर रिपोर्ट सीबीआयने मुंबईतील विशेष न्यायालयात सादर केला आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर तब्बल चार वर्षांनी सीबीआयने हा क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. त्यामुळे अभिनेत्री रिया चक्रवर्तीला क्लीन चिट मिळाली आहे. सीबीआयचा हा अहवाल स्विकारावा की नाकारावा किंवा पुढील तपासाचे आदेश द्यावेत का, यावर न्यायालय आदेश देईल, अशी माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्याने एका वृत्तसंस्थेला दिली आहे.
वांद्रे येथील घरात 14 जून 2020 रोजी अभिनेता सुशांतचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. याने एकच खळबळ उडाली. याचा तपास सुरुवातीला मुंबई पोलीस करत होती. नंतर हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. सखोल तपासाअंती सीबीआयने क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे.
विषप्रयोग, गळा दाबल्याची शक्यता नाकारली
सुशांतवर विषप्रयोग किंवा त्याचा गळा दाबण्यात आला ही शक्यता दिल्लीच्या एम्समधील फॉरेन्सिक तज्ञांनी नाकारली आहे. सुशांतच्या हत्येसाठी कोणताही गुन्हेगारी कट रचला गेला नाही. कोणतीही चुकीची गोष्ट करण्यात आली नाही, असेही सीबीआयने अहवालात नमूद केले आहे.
कुटुंबीयांचा आरोप
सुशांतच्या कुटंबीयांनी पाटणा येथे पोलिसांत तक्रार केली होती. अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केले. यामध्ये पैशांची अफरातफर व फसवणुकीचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला होता. बिहार की मुंबई पोलीस याचा तपास करणार यावरून वाद झाला होता. अखेर बिहार सरकारच्या विनंतीने केंद्र सरकारने हा तपास सीबीआयकडे सोपवला. सर्वोच्च न्यायालयानेही याला मान्यता दिली. त्यानुसार 6 ऑगस्ट 2020 रोजी गुन्हा दाखल करून सीबीआयने याचा तपास सुरू केला.