दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक का केली याचे गुपित आम्ही सर्वोच्च न्यायालयाला सांगू, असे सीबीआयने शनिवारी सांगितले. 4 जूननंतर नवीन घडामोडी घडल्याने केजरीवालांना अटक करावी लागली, असा दावा सीबीआयचे वकील डीपी सिंग यांनी केला आहे.
मद्य धोरण घोटाळय़ात अन्य आरोपींचा तपास पूर्ण झाला आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या भूमिकेची चौकशी करायची आहे, असे तपास यंत्रणेने सांगितले. जामीन मिळाल्यानंतर केजरीवाल यांना झालेल्या अटकेचे खरे कारण न्यायालयातच उघड होऊ शकेल.
बहुचर्चित मद्य धोरणप्रकरणी केजरीवाल यांच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत. ईडीने याचा पहिला गुन्हा दाखल केला. मनी लॉण्डरिंगचा हा गुन्हा आहे. 21 मार्च रोजी ईडीने केजरीवाल यांना अटक केली. दुसरा गुन्हा सीबीआयने दाखल केला. हा गुन्हा भ्रष्टाचाराचा आहे. 26 जून रोजी सीबीआयने केजरीवाल यांना अटक केली. 12 जुलैपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सीबीआयच्या अटकेला व कोठडीला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. याचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. यावरील पुढील सुनावणी 17 जुलैला होणार आहे.