
सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण ब्युरोने आज नीट यूजी परीक्षेतील पेपर चोरणाऱ्या दोघांना अटक केली. त्यांनी एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या ट्रंकमधून हे पेपर चोरल्याचे उघड झाले आहे. पंकज कुमार आणि राजू सिंग अशी त्यांची नावे आहेत. विशेष म्हणजे पंकज कुमार सिव्हिल इंजिनीयर आहे.
नीट पेपरफुटी आणि अनियमिततेप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता 14 वर पोहोचली आहे. परीक्षेतील कथित अनियमिततेची चौकशी करणाऱ्या तपास संस्थेने सहा एफआयआर नोंदवले आहेत. बिहारमधील एफआयआर पेपर लीकशी संबंधित आहेत तर उर्वरित गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रातील उमेदवारांची तोतयागिरी आणि फसवणुकीशी संबंधित आहेत. राजू सिंग या दुसऱ्या आरोपीने पेपर चोरण्यात आणि टोळीच्या इतर सदस्यांना पाठवण्यात मदत केली होती. सिंह यालाही हजारीबाग येथून अटक करण्यात आली.