बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटांवर विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख करण्यात आल्याबद्दल शिक्षण विभागावर टीका होऊ लागली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी तर याबद्दल संताप व्यक्त करतानाच शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यावर टीका केली आहे. जात पाहून विद्यार्थ्याला पास करायचे की नापास करायचे, हे ठरवण्यासाठी हा नवीन प्रकार आहे, अशा शब्दांत अॅड. आंबेडकर यांनी शिक्षणमंत्र्यांना सुनावले आहे.
प्रकाश आंबेडकर यासंदर्भात सोशल मीडियावर व्यक्त झाले आहेत. परीक्षेच्या हॉल तिकिटाची कायदेशीर वैधता किती आहे आणि शाळा सोडल्याच्या दाखल्याची किती आहे, हे एकदा कायदा विभागाला विचारून घ्या. जनता वेडय़ात काढेल अशी स्टेटमेंट देऊ नका असे अॅड. आंबेडकर यांनी शिक्षणमंत्री भुसे यांना म्हटले आहे. ‘‘70 च्या दशकात विद्यार्थ्यांच्या पाठीवर थोपटताना चाचपून निर्णय घेतला जात होता की, याला पहिल्या प्रयत्नात पास करायचे की तीन-चार प्रयत्न करायला लावायचे. तीच पद्धत नव्याने आणताय. बाटली बदलली तरी दारू तीच आहे. दारूच्या वासाने कुठली दारू आहे हे कळते. तेव्हा तुमचे आताचे धोरण म्हणजे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची जात हॉल तिकिटावर आणून तुम्ही काय करू बघताय, हे लोकांना कळते. लोक एवढे मूर्ख नाहीत,’’ असे अॅड. आंबेडकर यांनी नमूद केले आहे.