अजित पवार गटाचे देहू शहराध्यक्ष जात असलेल्या कारमधून रोकड जप्त

सोमाटणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या माजी उपसरपंचाच्या कार्यालयावर छापा टाकून तळेगाव दाभाडे पोलिसांनी 36 लाख 90 हजारांची रोकड जप्त केल्याचा प्रकार ताजा असतानाच देहू रोड पोलिसांनी अजित पवार गटाचे देहू शहराध्यक्ष जात असलेल्या कारमधून सव्वातीन लाखांची रोकड जप्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष विवेक वसंत काळोखे (वय 44, रा. काळोखेमळा, देहूगाव) आणि सागर निवृत्ती भसे (वय 39, रा.भीमाशंकर सोसायटी, देहूगाव) यांच्याकडून रोकड जप्त केली आहे. देहू रोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांनी याबाबत माहिती दिली. देहूगावातील चव्हाणनगर येथे दोनजण फॉर्च्यूनर कारमध्ये पैसे घेऊन मतदारांना वाटण्यासाठी आले आहेत, अशी माहिती देहू रोड पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी कारमध्ये सागर भसे आणि विवेक काळोखे हे दोघे होते. पोलिसांनी कारची तपासणी केली असता, ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटखाली चॉकलेटी रंगाच्या प्लॅस्टिक पिशवीमध्ये तीन लाख 20 हजार रुपयांची रोकड आढळली. या रकमेबाबत काळोखे व भसे यांच्याकडे विचारपूस केली असता, त्यांनी समर्पक उत्तरे न दिल्याने, तसेच त्यांनी ही रक्कम कोठून आणली याबाबत काहीही कागदपत्रे उपलब्ध नसल्याने रोकड दोन पंचांसमक्ष जप्त करून सील करण्यात आली. पुढील कारवाईकरिता ही रोकड निवडणूक विभागाच्या भरारी पथकाच्या ताब्यात देण्यात आली आहे.