दिल्ली हायकोर्टाच्या न्यायाधीशांच्या घरी सापडली रोकड, सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने केली कारवाई

supreme court

न्यायाधीश यशवंत वर्मा यांची दिल्ली उच्च न्यायालयातून अलाहाबादला परत बदली करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने घेतला आहे. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्यानं बातमी दिली आहे की, गेल्या आठवड्यात होळीच्या सुट्ट्यांमध्ये न्यायाधीशांच्या यशवंत वर्मा यांच्या अधिकृत बंगल्यात मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रोख रक्कम सापडली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला बोलले जात आहे.

गेल्या आठवड्यात इमारतीत आग लागली होती. यावेळी ही रोकड घरात असल्याचे उघड झाले होते. आग लागली तेव्हा वर्मा यांच्या कुटुंबातील सदस्य शहरात नव्हते. त्यांनी आपत्कालीन सेवेसाठी फोन केला. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र तेव्हाच यंत्रणेला न्यायाधीशाच्या घरात मोठी रक्कम असल्याचे लक्षात आले त्यांनी तात्काळ पोलिसांना फोन करून याची माहिती दिली.

माध्यमांद्वारे प्रकरणाची माहिती मिळताच, सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील कॉलेजियमने न्यायाधीश वर्मा यांची बदली करण्याचा निर्णय घेतला, असे एनडीटीव्हीच्या वृत्तात म्हटले आहे. न्यायाधीश वर्मा यांनी अद्याप रोख रकमेच्या जप्तीबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोख रक्कम सापडल्यानंतर या प्ररकरणाची मुख्य न्यायाधीशांनी गंभीर दखल घेतली आणि पाच सदस्यांच्या कॉलेजियमने एकमताने सहमती दर्शविली, न्यायाधीश वर्मा यांच्या बदलीवर एकमताने सहमती दर्शवण्यात आल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

अजून कठोर कारवाई होण्याची शक्यता?

मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, काही सदस्यांना असे वाटते की न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा खराब होऊ नये म्हणून आणखी कठोर कारवाई करणे आवश्यक होती. कठोर कारवाई न झाल्यास लोकांना न्यायव्यवस्थेवर विश्वास राहणार नाही. त्यामुळे न्यायाधीश वर्मा यांना राजीनामा देण्यास सांगितले जाईल अशीही चर्चा होती, असेही एनडीटीव्हीच्या वृत्तात म्हटले आहे.

जर त्यांनी असे करण्यास नकार दिला तर, कॉलेजियममधील काही सदस्यांना असे वाटते की, सरन्यायाधीश अंतर्गत चौकशी सुरू करू शकतात आणि त्यांना संसदीय मार्गाने काढून टाकण्याचे हे पहिले पाऊल असेल.