
तालुक्यातील शेंदूरवादा परिसरातील गुरू धानोरा येथील साठवर्षीय वृद्धाला मारहाण करत रोख रकमेसह दागिने चोरल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. चोरट्यांच्या मारहाणीत अशोक सावजीराम बनकर गंभीर जखमी झाले. तीन दिवसांपासून चोरटे बनकर कुटुंबाच्या मागावर होते.
अशोक बनकर हे घरामध्ये झोपले होते. पत्नी लीलाबाई बनकर गावातील मुलाकडे मुकामाला थांबल्या होत्या. अशोक बनकर हे एकटेच झोपले होत. मध्यरात्री दोन ते अडीच वाजता चोरट्यांनी घराची भिंत फोडून आतमध्ये प्रवेश केला. अशोक बनकर यांच्यावर शस्त्राने वार करत मारहाण करून त्यांचे हात पाय बांधले. मोबाईल हिसकावला. रोखसह सोन्याचे दागिनेही लंपास केले. मारहाणीत अशोक बनकर गंभीर जखनी होऊन दोन तास बेशुद्ध अवस्थेत पडून होते. शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी आरडाओरड सुरू केली. आवाज ऐकताच शेजारी राहणारे त्यांची मुले जागी होऊन त्यानी बाहेर येण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याही घराचे दरवाजे बाहेरून बंद केलेले असल्यामुळे त्यांना लवकर बाहेर पडता आले नाही.
पोलीस चौकी वाऱ्यावर
शेंदूरवादा येथे दोन वर्षापुर्वी तत्कालीन पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी पोलीस चौकी सुरू केली. चौकीने नागरिकांना चांगली सुविधा दिली. मात्र आता चक्क बंद पडली. पोलीस चौकी पुन्हा सुरू करून पोलिसांची गस्त वाचवण्याची मागणी होत आहे.
चोरटे तीन दिवसांपासून मागावर…
अशोक बनकर यांना तीन दिवसापासून तुमच्या मागावर असल्याचे चोरट्यांनी सांगून तुमच्या पत्नीच्या अंगावर भरपूर दागिने आहेत. आम्ही त्यासाठी आलो आहोत. तुमची पत्नी कुठे आहे अशी विचारणा केली असल्याची असल्याचे बनकर यांनी सांगितले आहे. पत्नी गावात मुलाकडे असल्याने मोठा अनर्थ टळला. बनकर यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे दाखल केले. घटनास्थळी श्वानपथकास पाचारण करण्यात आले होते. ए.एस.आय मच्छिंद्र तनपुरे, पो कॉ. रामेश्वर हरकळा श्वान डॉग स्विटी व ठसेतज्ञ टीमने घटनास्थळाची पाहणी केली. पुढील तपास वाळूज पोलीस करत आहेत.