
दहावीची मराठीची परीक्षा सुरू होताच प्रश्नपत्रिका झेरॉक्स आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हायरल करण्यात आल्याने यवतमाळ आणि जालन्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालन्यातील बदनापूरच्या परीक्षा केंद्रावरून पेपर झेरॉक्स सेंटरवर आढळून आला. या प्रकरणात शिक्षण अधिकारी मंगला धुपे यांच्या फिर्यादीवरून बदनापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात सीएससी (कॉमन सर्व्हीस सेंटर) चालकासह एका इंग्रजी माध्यमातील शाळेच्या कर्मचाऱ्याचा समावेश आहे.
गुरुवारी दहावीचा मराठीचा पेपर सकाळी अकराच्या सुमारास सुरू झाला. त्यानंतर काही वेळातच बदनापूर शहरातील सीएससीवर उत्तर पत्रिकेची झेरॉक्स मिळत असल्याचे समोर आले आहे. म्हणजे मराठीचा पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटातच प्रश्नपत्रिका परीक्षा पेंद्राच्या बाहेर आली. या प्रश्नपत्रिकांच्या आधारे विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी काही तरुणांची परीक्षा केंद्राबाहेर हुल्लडबाजी केली.
जालन्याप्रमाणे यवतमाळ येथील महागाव तालुक्यात मराठीची प्रश्नपत्रिका व्हॉट्सअपवर व्हायरल झाल्याचे आढळून आले. या संदर्भात तक्रार दाखल झाल्यानंतर महागाव पोलिसांनी कोठारी येथील आदर्श विद्यालयाचे पेंद्र संचालक शाम तासके आणि एक मोबाईल क्रमांक धारकावर गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना विचारले असता त्यांनी पेपरफुटी झाली सांगितले. मात्र काही ठिकाणी कॉपी पुरविण्याचे प्रकार समोर आलेत. त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. ज्या केंद्रावर कॉपी झाली ते केंद्र रद्द करण्यात आले आहे. कॉपी पुरवणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल, असे भुसे यांनी म्हटले.
जालन्यातील पेपरफुटीप्रकरणी पोलिसांनी रात्री एका झेरॉक्स सेंटरच्या चालकाला ताब्यात घेतले होते तर काही विद्यार्थ्यांना चौकशीकरिता बोलावले होते. तसेच एका परीक्षा केंद्रावर मोठा जमाव जमला होता. त्यांच्याकडून दगडफेक झाली. हा प्रकार वगळता परीक्षा सुरळीत पार पडली.
– डी. एन. क्षीरसागर,प्रभारी गटशिक्षणाधिकारी