एलपीजी वायू गळतीनंतर हात वर करुन उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या जिंदाल कंपनीला प्रशासन आणि ग्रामस्थांनी वठणीवर आणले आहे. कंपनीवर कारवाई करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून जिंदाल कंपनीवर गुन्हा दाखल करण्यासाठी तहसीलदारांनी पावले उचलली आहेत. जिंदाल कंपनीत निष्काळजीपणा करणाऱ्या दोन ववस्थापक आणि दोन अभियंते यांच्यावर तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गंगाधर बंडो पाध्याय, भाविन पटेल, सिध्दार्थ पटेल आणि दीप विटलानी अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. या चौघांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, वायू गळतीमुळे प्रकृती बिघडलेल्या 69 जणांवर उपचार सुरु आहेत. दुर्घटनाग्रस्त सर्वांना नुकसान भरपाई जिंदाल कंपनीने देण्याची मागणीही करण्यात आली आहे. जिंदाल कंपनीमध्ये गुरुवारी एलपीजी वायू गळती होऊन परिसरात असलेल्या माध्यमिक विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. एकूण 68 विद्यार्थी आणि एका महिलेची प्रकृती बिघडली. 61 जणांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून 8 जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
वायुगळतीच्या घटनेनंतर जिंदाल कंपनीने उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका किंवा अन्य कोणत्या वाहनांची सुविधाही कंपनीने उपलब्ध करुन दिली नाही. कंपनीचा एक अधिकारीही पुढे आला नाही. त्यामुळे पालक आणि ग्रामस्थ संतापले होते.
कारवाईसाठी समिती स्थापन जिंदाल कंपनीमध्ये झालेल्या वायूगळतीनंतर कंपनीवर कारवाईसाठी प्रशासनाने एक समिती स्थापन केली आहे. अप्पर जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष आहेत. सचिव, प्रांताधिकारी, शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी, बंदर अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, वायू गळती तज्ज्ञ, औद्योगिक सुरक्षा विभागाचे उपसंचालक, शालेय समितीचे दोन पदाधिकारी, तीन ग्रामस्थ यांचा या समितीत असणार आहे. ही समिती वायू गळती झाल्याची कारणे शोधणार आहे. तसेच भविष्यात वायू गळती होऊ नये याकरीता उपाय योजना करणार आहे. तसेच दुर्घटनाग्रस्तांना नुकसान भरपाई मिळवून देण्याकरीता ही समिती काम करणार आहे.
सखोल चौकशी करा; ग्रामस्थ आक्रमक
जयगड परिसरातील ग्रामस्थांनी शुक्रवारी जयगड पोलीस ठाण्यात जाऊन काल घडलेल्या दुर्घटनेबाबत जिंदाल कंपनीवर गुन्हा दाखल करावा. तसेच संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली. गुरुवारी झालेल्या दुर्घटनेनंतर जिंदाल कंपनीचे कोणी अधिकारी मदतीकरीता पुढे आले नाहीत. आतापर्यंत जिंदाल कंपनीने दिलेल्या आश्वासनांची केवळ फसवणूक केल्याचाही संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला.