नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत देशाबरोबरच सर्वांना पुढे जावे लागत आहे. त्यामध्ये फायदे व तोटे असले तरी सर्वांनी जागृत असणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत अनोळख्या नंबरवरून आलेले पह्न, मेजेस, ओटीपी यांना प्रतिसाद देऊ नका, कोणत्याही लिंक उघडून पाहू नका. त्याही परिस्थितीत कोणाची ऑनलाईन फसवणूक झाल्यास नागरिकांनी वेळच्या वेळी म्हणजेच ‘गोल्डन अवर्स’मध्ये तक्रार करावी तरच आपले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे, असे आवाहन सायबर पोलीस अधिकारी विवेक तांबे यांनी केले.
जनसहयोग फाऊंडेशन संस्थेच्या वतीने सायबर फसवणूक कशी टाळावी यावर दहिसर येथील बोनाव्हेंचर संकुलात रविवारी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सायबर पोलीस अधिकारी विवेक तांबे यांनी सायबर गुह्यांसंदर्भात मार्गदर्शन केले. या वेळी निवृत्त सहायक पोलीस आयुक्त मुपुंद पवार, महेश देसाई, विजय कांदळगावकर यांच्यासह जनसहयोग संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर पवार, संस्थेचे सल्लागार मिलन मेहता, राजू बांदेकर, बोनाव्हेंचर संकुलाचे अध्यक्ष राजेश शुक्ला, सेव्रेटरी संजय सिंह, माजी सेव्रेटरी तुकाराम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सध्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. अनेकांचे व्यवहार मोबाईलवरूनच होत असतात. त्याचा फायदा घेत सध्या डिजिटल अटक, गुंतवणूक घोटाळा, कमी पैशांत जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवणे, व्हिडीओद्वारे धमकी देणे, पह्न हॅक करून त्याच नंबरवरून आपल्या नातेवाईकांना, मित्रांना मेजेस पाठवून पैसे मागण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. यामध्ये तरुणांपासून वयोवृद्धांचीही फसगत होत आहे. अशा वेळी कोणतीही खातरजमा न करता नागरिकांकडून थेट पैसे पाठविले जातात. अशा सायबर गुह्यांना आळा घालण्यासाठी अनोळखी नंबरवरून आलेले पह्न, मेसेज यांना प्रतिसाद देऊ नका, असे तांबे म्हणाले. त्याचबरोबर फेसबुक, व्हॉटस्अॅपवरून आलेल्या फ्रेंडस रिक्वेस्ट स्वीकारू नका, अनोळख्या व्यक्तींशी मैत्री टाळावी. कोणीही अटकेची धमकी देत असेल तर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा. त्यासाठी 1930 या क्रमांकावर संपर्क साधावा, अशी सूचनाही तांबे यांनी केली.
दरम्यान, सायबर गुन्हे म्हणजे काय? तो कसा केला जातो? त्यामुळे गुन्हे कसे वाढतात? यावर निवृत्त पोलीस अधिकारी मुपुंद पवार यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. इंटरनेटमुळे जसे जग जोडले जाते, तसे सायबर गुह्यांचे प्रकार वाढीस लागले असल्याचे पवार यांनी सांगितले. अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी आपल्या मोबाईलचे व घरचे इंटरनेट, बँकेचे पासवर्ड वेळोवेळी बदलायला हवेत, असे पवार म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप चोणकर यांनी केले. चोणकर यांनी सायबर गुह्यांसंदर्भात लोकांच्या मनातील प्रश्न विचारत सर्वांची मने जिंकली.