
तिर्लोट आंबेरी येथील विवाहिता शिरीषा उर्फ श्रीशा सुरज भाबल (24) हिला शिवीगाळ व मानसिक त्रास देऊन तिला तिच्या दोन्ही लहान मुलांसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती सुरज सुहास भाबल (37), सासरे सुहास शिवराम भाबल (77), सासू सुहासिनी सुहास भाबल (65) व नणंद पूजा सदाशिव जोगल (30) या चौघांविरुद्ध विजयदुर्ग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैकी श्रीशाच्या पतीसह सासू सासरे या संशयितांना विजयदुर्ग पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत श्रीशाची आई श्रीमती चंद्रकला लोकेश कुमार (३8) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. या घटनेप्रकरणी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांनी विजयदुर्ग पोलीस स्थानकाला भेट देऊन योग्य तपासाबाबत सूचना केल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीशा हिचे 22 जून 2018 रोजी तिर्लोट आंबेरी येथील सुरज भाबल याच्याशी लग्न झाले होते. लग्न झाल्यापासून तिचे सासरे सुहास भाबल, सासू सुहासिनी भाबल, नणंद पूजा भाबल व पती सुरज हे चौघे तिला मानसिक त्रास देऊन शिवीगाळ करीत होते. ‘तू आमची चांगली सेवा करीत नाही. आमची पहिली सून आमची चांगली सेवा करायची. तू चांगली नाहीस’, असे टोचून बोलून शिवीगाळ व मानसिक त्रास देऊन तिला अनावश्यक कामे करायला सांगून शारिरीक त्रास दिला जायचा. तिचा पती सूरज हा देखील श्रीशा हिचीच चूक काढून तिला शिवीगाळ करीत असे. तर तिची नणंद पूजा ही त्यांच्या घरी जायची तेव्हा तीही श्रीशाला शिवीगाळ करून मानसिक त्रास देत होती. या त्रासाला कंटाळून श्रीशाने यापूर्वीही दोनवेळा जीवन संपविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आपल्या मुलांकडे पाहून तिने जीव दिला नाही, असे श्रीशाच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले असून ‘संसारात अशा लहानमोठ्या गोष्टी होत असतात. त्याकडे आपण दुर्लक्ष करून संसार करायचा असतो’, असे सांगून आपण श्रीशाची समजूत काढत होतो, असेही त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
श्रीशाने सासूच्या मोबाईलवरून तिच्या आईला 15 एप्रिल 2025 रोजी फोन करून तिला संशयितांकडून केल्या जाणाऱ्या मानसिक व शारिरीक त्रासाची माहिती दिली होती. तिच्या आईने त्याचदिवशी सायंकाळच्या सुमारास पुन्हा श्रीशाची मोबाईलवरून संपर्क साधून समजूत काढली होती. मात्र, ‘आतापर्यंत मी खूप त्रास सहन केलेला आहे. मला समजून घेणारे कोणीच नाही’, असे सांगून श्रीशाने फोन कट केला होता, असे तिच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, सासरच्या संशयितांनी श्रीशाला मानसिक त्रास देऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. तिला जगणे असह्य झाल्याने तिने आपले मुलगे श्रेयश (वय 5) व दुर्गेश (वय 4) यांना सोबत घेऊन तिर्लोट आंबेरी पूलावरून खाडीच्या पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली, असे श्रीशाच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीनुसार विजयदुर्ग पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास विजयदुर्गचे पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, पोलीस हवालदार प्रशांत जाधव करीत आहेत.