म्हाडाच्या उपाध्यक्षासह 12 जणांविरोधात गुन्हा

म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्यासह 12 जणांनी मारहाण करून डांबून ठेवल्या प्रकरणी निवृत्त पोलीस अधिकाऱयाने खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, म्हाडाच्यावतीनेही तक्रारदार पोलीस अधिकाऱयाविरोधात धक्काबुक्की आणि सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अंधेरी पश्चिम येथील गृहनिर्माण सोसायटीच्या पुनर्विकासात काही रहिवाशांना घराचा ताबा मिळाला होता, तर आठ ते दहा रहिवाशांचा विकासकासोबत वाद सुरू आहे. याप्रकरणी म्हाडा मुंबई मंडळाने दिलेला निर्णय रहिवाशांना मान्य नव्हता. यासंदर्भात हे पोलीस अधिकारी संजीव जयस्वाल यांना भेटण्यासाठी दालनात आले होते. त्यावेळी हा सगळा प्रकार घडला. दरम्यान, या पोलीस अधिकाऱयानेच जयस्वाल यांना धक्काबुकी केली आणि सरकारी कामात अडथळा आणला असा आरोप करत या अधिकाऱयाविरोधातही खेरवाडी पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता.