
रस्त्याच्या कडेला बेकायदेशीरपणे दुहेरी पार्किंग केलेल्या गॅस सिलिंडरच्या ट्रकला सोमवारी रात्री भीषण आग लागली. या घटनेत चार ते पाच वाहनांचे नुकसान झाले. या प्रकरणी धारावी पोलिसांनी या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या व रस्त्यावर दुहेरी पार्किंग करणाऱ्या आठहून अधिक जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
धारावीच्या निसर्ग उद्यान परिसरात गॅस सिलिंडरने भरलेला ट्रक रस्त्यावर दुहेरी पार्क केलेला होता. त्या ट्रकला अचानक आग लागून सिलिंडरचा स्फोट झाला. या घटनेमुळे परिसरात एकच हाहाकार उडाला होता. या आगीत आजूबाजूला असलेल्या चार ते पाच गाड्या जळून खाक झाल्या. याची गंभीर दखल घेत धारावी पोलिसांनी त्या ट्रकचा चालक बाबू पुजारी, त्या ट्रकमधून एलपीजी गॅस सिलिंडर सप्लाय करणारा निनाद केळकर, व्यवस्थापक नागेश नवले या ट्रकबरोबरच दुहेरी पार्किंग करणारा टेम्पो चालक वेलू नाडर, ट्रक चालक सोनू चारमोहन, शिधावाटप दुकान मालक अनिल गुप्ता तसेच त्या ठिकाणी अनधिकृत पार्किंग करण्यास सांगून चालकांकडून पैसे उकळणारा तरबेज शेख यांच्यासह अन्य वाहन चालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.