मणिपूरमधील हिंसाचाराला युकेमधून हवा? हिंदुस्थानी वंशाच्या व्यक्तीविरोधात तक्रार

ब्रिटनच्या एका विद्यापीठात शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या हिंदुस्थानी वंशाच्या व्यक्तीनं जातीय हिंसाचाराने ग्रस्त असलेल्या मणिपूरमधील समुदायांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून संदेश पाठवत चिथावल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंबंधी इंफाळमध्ये पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस तक्रारीत आरोपीचा कॅनडातील खलिस्तानी घटकांशी संबंध असू शकतो, असाही संशय व्यक्त करण्यात आला आहे.

उदय रेड्डी असे आरोपीचे नाव असून तो बर्मिंगहॅम विद्यापीठात संगणक विज्ञानाचा प्राध्यापक आहे. मणिपूरमध्ये धार्मिक कारणास्तव समुदायांमध्ये तणाव निर्माण करण्यासाठी ऑनलाइन पोस्ट करत होता, असा आरोप करण्यात आला आहे. आरोपी व्यक्तीने जाणूनबुजून मैतेई समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे इतर समुदायांमध्ये वैर वाढवले आहे, असे एका स्थानिक रहिवाशांने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये नमूद केले आहे.

रेड्डी सोशल मीडियावर ऑडिओ चर्चासत्र होस्ट करतात आणि मणिपूरमधील लोकांना कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कसा अडथळा निर्माण करायचा, याबद्दल मार्गदर्शन करतात, असे तक्रारदाराने पोलिसांना सांगितले. तसेच आरोपी व्यक्तीचे एक्स खाते देखील बंद करण्याची मागणी केली जात आहे.

आरोपी व्यक्ती व त्याच्या साथीदारांच्या बेकायदेशीर कृत्यांमुळे हिंदुस्थानच्या अखंडतेला आणि सार्वभौमत्वाला आव्हान देणाऱ्या देशविरोधी कृत्य केली जात आहेत. संबंधित कायद्यानुसार योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे, असेही तक्रारदारांने म्हटले आहे.

खलिस्तानी गटाशी आरोपीचा संबंध

आरोपीचा कॅनडातील खलिस्तानी आणि नार्को-दहशतवादी गटांशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आरोपीचे सर्व कॉल रेकॉर्ड, आर्थिक देवाण-घेवाण याची चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे.

मणिपूर भौगोलिक स्थिती

मणिपूरची राजधानी इंफाळ असून क्षेत्रफळाच्या 10 टक्के आहे. राज्यातील जवळपास 7 टक्के लोकसंख्या या भागात वास्तव्यास आहे. उर्वरित 90 टक्के भाग हा डोंगराळ प्रदेशात आहे. त्यामध्ये 43 टक्के लोक राहतात. राजधानी इंफाळमध्ये मैतेई समाजाचे लोकं राहतात जे हिंदू आहेत. महत्त्वाचे म्हणजे मणिपूरच्या लोकसंख्येमध्ये मैतेई समाजाचे 53 टक्के लोक आहेत. विधानसभेतील 60 जागांपैकी 40 आमदार हे मैतेई समाजाचे आहेत. राहिलेल्या पर्वतीय आणि डोंगराळ भागांमध्ये 33 मान्यताप्राप्त जमाती राहतात. यामध्ये नागा आणि कुकी या मुख्य जमाती असून या ख्रिस्ती आहेत. त्यासोबतच मणिपूरमधील 8 टक्के मुस्लिम समाजाचे लोक राहतात.