सरन्यायाधीशांची बदनामी करणाऱ्या तोतयाविरोधात गुन्हा दाखल; सोशल मीडियावर केली होती पोस्ट

सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांची बदनामी केल्याप्रकरणी पश्चिम बंगालच्या एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुजित हलदर असे त्या व्यक्तीचे नाव आहे. त्याने सरन्यायाधीशांची बदनामी करण्यासाठी, जनतेत अविश्वास निर्माण करत शांतता भंग करण्याच्या हेतूने अशा पोस्ट केल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिष्ठेवर हल्ला चडवण्याचाही त्याने प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले.

सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियावर हलदरने खोट्या बातम्या प्रसारित केल्या होत्या. याप्रकरणी पश्चिम बंगालच्या कृष्णनगर येथील हलदरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.याबाबत पोलिसांनी एक्सवर याबाबतची माहिती दिली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. तसेच जनतेने अशा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये, तसेच अशा पोस्ट फॉरवर्ड करू नये, असे आवाहन केले आहे. हलदरने एक्सवर केलेल्या एका पोस्टमुळे त्याची तोतयागिरी आणि सरन्यायाधीशांच्या बदनामी करण्याचा हेतू उघड झाला.

त्याने पोस्टद्वारे आपण सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड असल्याचा दावा केला. तसेच आपण दिल्लीतील कॅनॉट प्लेस या ठिकाणी अडकलो आहोत. आपल्याला तातडीने 500 रुपयांची गरज आहे. सर्वोच्च न्यायालयातील महत्त्वाच्या कॉलेजियमच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आपण येथून टॅक्सी करू शकू. त्याने पोस्टमध्ये म्हटले होते की, नमस्कार, मी सरन्यायाधीश आहे आणि आमची कॉलेजियमची तातडीची बैठक आहे आणि मी कॅनॉट प्लेसमध्ये अडकलो आहे. तुम्ही मला कॅबसाठी 500 रुपये पाठवू शकता का? मी न्यायालयात पोहोचल्यावर ते पैसे परत करीन,असेही त्याने पोस्टमध्ये म्हटले होते.

अशाप्रकारे सरन्यायाधीशांची बदनामी केल्याप्रकरणी तसेच समाजात अशांतता आणि अस्वस्थता पसरवण्यासाठी त्याने अशी पोस्ट केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. आता या प्रकरणी हलदरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.