…ही व्यंगचित्रकला स्वातंत्र्याची गळचेपी, सतीश आचार्य यांना बजावलेल्या नोटीसचा ‘कार्टुनिस्ट कंबाईन’कडून तीव्र निषेध

सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार सतीश आचार्य यांना त्यांच्या व्यंगचित्रांबद्दल मुंबई पोलिसांनी बजावलेल्या नोटीसचा मराठी व्यंगचित्रकारांच्या कार्टुनिस्ट कंबाईन या संस्थेने तीव्र निषेध केला आहे. ही व्यंगचित्रकला स्वातंत्र्याची गळचेपी आहे, असा संताप संस्थेने व्यक्त केला आहे.

सतीश आचार्य यांना पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर व्यंगचित्रकारांमध्ये संताप व्यक्त होत आहे. कार्टुनिस्ट कंबाईनचे अध्यक्ष संजय मिस्त्री यांनी त्याबद्दल प्रतिक्रिया देताना म्हटले की, सतीश आचार्य आणि देशातील अनेक व्यंगचित्रकार हे गेली अनेक वर्षे राज्यकर्त्यांच्या चुका त्यांच्या व्यंगचित्रातून दाखवत आहेत. व्यंगचित्रकारांचे ते कर्तव्य असते. व्यंगचित्रकाराला कोणताही पक्ष नसतो. तो निःपक्षपाती असतो आणि देशाच्या घटनेने प्रत्येक नागरिकाला त्याचे मत चांगल्या मार्गाने मांडण्याचा अधिकार अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या माध्यमातून दिला आहे.

व्यंगचित्रकला हा प्राचीन आणि अर्थातच कुणालाही न दुखावता योग्य आणि चांगला मार्ग दाखविणारा कला प्रांत आहे. परंतु गेल्या काही वर्षांत अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी होताना दिसत आहे, असे संजय मिस्त्री म्हणाले. व्यंगचित्रकला आणि व्यंगचित्रकार यांचा जगज्जेत्यांकडूनही सन्मान ठेवला जात होता आणि जगज्जेते त्यांना घाबरायचेही, असे सांगत मिस्त्राr यांनी इतिहासातील काही दाखलेही दिले. व्यंगचित्रकार जेम्स गिल्लरीने फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बोनापार्टवर टीका करणारी असंख्य व्यंगचित्रे काढली होती. तरीही नेपोलियन त्याचा सन्मान करायचा. मी शत्रूच्या सैन्यापेक्षा जेम्स गिल्लरीच्या व्यंगचित्रांना घाबरतो, असे नेपोलियन म्हणायचा. हिंदुस्थानातून फक्त हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची व्यंगचित्रे ज्यांच्या चरित्रात प्रसिद्ध झाली आहेत ते इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांना इंग्लंडचा लोकप्रिय व्यंगचित्रकार डेव्हिड लो याची व्यंगचित्रे आवडत. हिटलरने तर डेव्हिड लो याच्या व्यंगचित्रांचा धसका घेतला होता. त्याला पकडून आणण्याची सूचना त्याने केली होती. आपल्या चुका दाखविणारा हा गुप्तधन दाखवत असतो, त्यामुळे चुका दाखविणाऱया व्यंगचित्रकारांचा, पत्रकारांचा शासनकर्ते सन्मान राखत असत, असे मिस्त्री यांनी सांगितले.

बाळासाहेबांनी नेहमीच व्यंगचित्रकारांचा आदर राखला

शिवसेना-भाजपा युतीची सत्ता होती त्यावेळी माझ्याबरोबरच विकास सबनीस, प्रशांत कुलकर्णी, प्रभाकर वाईरकर, उमेश कवळे या व्यंगचित्रकारांनी असंख्य व्यंगचित्रे सरकारवर टीका करणारी रेखाटली. पण हे व्यंगचित्रकार जेव्हा जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांना भेटत असत त्यावेळी बाळासाहेब त्यांचे कौतुक करत, अशी आठवणही मिस्त्राr यांनी सांगितली.

आदित्य ठाकरे यांच्या भूमिकेलाही पाठिंबा

सतीश आचार्य यांना पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर, सत्य आणि योग्य व्यंगचित्रांना पोलिसांनी का म्हणून नोटीस बजावली असा सवाल शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांनी केला होता. व्यंगचित्रकलेबद्दल आदर व्यक्त करणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्या त्या व्यंगचित्रविषयक भूमिकेलाही कार्टुनिस्ट्स कंबाईनने पाठिंबा दर्शविला आहे.