व्यंगचित्रकार सतीश आचार्य यांना नोटीस; या व्यंगचित्रांमध्ये काय चूक आहे? आदित्य ठाकरे यांचा सवाल

व्यंगचित्रकार सतीश आचार्य यांना ‘मुंबई लॉ एन्फोर्समेंट एजन्सी’ने त्यांच्या काही व्यंगचित्रांबाबत नोटीस पाठवली आहे. यावर शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अधिकृत हँडलवरून याबाबत एक्सवर पोस्ट करत तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीही एक्सवर पोस्ट करत या व्यंगचित्रांमध्ये काय चूक आहे असा रोखठोक सवाल केला आहे.

प्रसिद्ध व्यंगचित्रकार सतीश आचार्य यांना त्यांच्या काही व्यंगचित्रांबाबत ‘मुंबई लॉ एन्फोर्समेंट एजन्सी’ने नोटीस पाठवली आहे. यावर सतीश आचार्य यांनी उपहासिक प्रतिक्रिया दिली आहे. हे जाणून खूप आनंद झाला की मुंबई कायदा आणि सुव्यवस्थेसह शांत आहे. त्यामुळे आता पोलिसांनी आता व्यंगचित्रांवर लक्ष केंद्रित करत आहेत, असे सतीश आचार्य यांनी म्हटले आहे.

या घटनेबाबत आदित्य ठाकरे यांनीही एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पूर्णपणे सत्य आणि योग्य असलेल्या व्यंगचित्रांना आता ‘मुंबई कायदा अंमलबजावणी एजन्सी’ कडून नोटिस पाठवली आहेत. एक्स हे ट्विटर हँडल एलॉन मस्क यांनी भाषण स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यासाठी, विशेषत: जे इतर कोणाच्याही गोपनीयता/स्वातंत्र्य/अधिकारांना पायदळी तुडवत नाही.या हेतून ताब्यात घेतले होते. मात्र, सध्या काय परिस्थिती आहे. तसेच या व्यंगचित्रांमध्ये काय चूक आहे? असा सावलही आदित्य ठाकरे यांनी मुंबई पोलिसांना केला आहे. यात नेमके काय आहे. कोणाला त्रास देणारे काही? काही खोटे? काही अपमान? यासारखे काहीही त्यात नाही, असेही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) एक्स हँडलवर याबाबत पोस्ट करत व्यंगचित्रकार सतिश आचार्य ह्यांना ‘मुंबई लॉ एन्फोर्समेंट एजन्सी’ची नोटीस! बेलगाम राजकीय ताकद ‘कुंचला’ मोडू पाहतेय का? असा सवाल करत या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे.