
इन्स्टाग्राम या समाज माध्यमावर अश्लील संदेश पाठवून विकृत तरुण अक्षरशः एका तरुणीचा छळ करीत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून तरुणीने मुलुंड पोलिसांकडे मदतीसाठी धाव घेतली. पोलिसांनी लगेच कारवाई करत अहिल्यानगर येथून अब्दुल मोहम्मद अब्दुल मोईन ताहीर या विकृताच्या मुसक्या आवळल्या.
मुलुंड येथे राहणारी आएशा (21, नाव बदललेले) ही विद्यार्थिनी आहे. आएशाच्या इन्स्टाग्राम खात्यावर वेगवेगळय़ा इन्स्टाच्या खात्यावरून अश्लील संदेश तसेच व्हिडीओ पाठविले जात होते. त्या विकृताने सातत्याने असे कृत्य करून आएशाला हैराण केले होते. त्यामुळे वैतागून अखेर आएशाने मुलुंड पोलीस ठाण्यात जाऊन अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून वरिष्ठ निरीक्षक अजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षण शिवाजी चव्हाण, उपनिरीक्षक शिवानंद अपुणे, अमोल बोरसे व पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक बाबींच्या आधारे तपास केला असता विकृत चाळे करणारा अहिल्यानगर येथे असल्याची माहिती समोर आली.