मुद्दा – अल्कराज पुन्हा विम्बल्डन सम्राट

>> अनिल दत्तात्रेय साखरे

दरवर्षी जून महिन्यामध्ये सुंदर आकर्षक असा हिरवा शालू परिधान करून इंग्लंडमधील विम्बल्डनची खेळपट्टी पुन्हा एकदा नव्याने साजशृंगार करून नवनवीन खेळाडूंना आपल्या अंगाखांद्यावरती खेळवण्यासाठी सज्ज झालेली असते. जगभरातील खेळ बदलले, खेळाचे नियम बदलले, मैदाने बदलली, पण बदलले नाही ते विम्बल्डन. आजपण आपली शेकडो वर्षांची परंपरा तशीच ठेवून हिरवळीवर चालणारे इंग्लंडमधील विम्बल्डन सामने जगभरातील टेनिसप्रेमींमध्ये आपले आकर्षण आणि मानसन्मान टिकवून आहेत. हे सामने बघणे ही टेनिसप्रेमी रसिकांसाठी मोठी मेजवानीच असते. आपल्या आजारपणामुळे वर्षभरामध्ये सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये भाग न घेणाऱया युवराज्ञी पेंट मिडल्टन या जातीने बक्षीस समारंभासाठी उपस्थित राहिल्या होत्या. त्यासोबतच या वर्षी माजी अमेरिकन विजेता एमा रँडुकानू, अभिनेता टॉम क्रूझ, बेनेडिक यांची उपस्थिती ही अभिनंदनीय अशीच होती. विम्बल्डन स्पर्धा त्यासोबत स्ट्रॉबेरी आणि क्रीम खाणे हे नाते या वर्षी पण इंग्लंडमध्ये पाहायला मिळाले आणि या वर्षी पण विम्बल्डनच्या हंगामामध्ये जवळपास 45 ते 50 टन स्ट्रॉबेरी आणि 12 ते 15 टन क्रीम फस्त केले गेले.

विम्बल्डनचा अंतिम सामना हा मागील वर्षाप्रमाणेच अल्कराज आणि नोव्हाक जोकोविच यांच्यामध्येच रंगणार होता व टेनिसप्रेमींनाही मागील वर्षाप्रमाणे पुन्हा एकदा दोघांमध्ये रंगणारी पाच सेटमधील जुगलबंदी पाहायला मिळणार असे वाटत होते. आपले सिल्वर जुबिली ग्रँड स्लॅम मिळवण्यासाठी जोकोविच उत्सुक होता, तर तरुण तडफदार आक्रमक अशा अल्कराजच्या खेळामध्ये या वर्षी खूपच फरक जाणवत होता. त्याचे बॅक हँड, पह्र हँड, स्मॅश असे फटके, बेसलाईनजवळ मारलेले अचूक आणि नियंत्रित असे फटके जोकोविचला परतून लावणे फार कठीण जात होते. अगदी पहिल्या सेटपासूनच अल्काराजने आपण विम्बल्डनच्या विजेतेपदावरती दावा टाकण्यासाठीच खेळत आहोत असे आपले इरादे स्पष्ट केले होते आणि पहिल्या सेटमध्येच त्याने जोकोविचची सर्व्हिस दोन वेळा भेदली आणि त्यानंतर पहिला सेट त्याने 6-2 असा सहज जिंकून घेतला. दुसऱया सेटमध्येही अल्कराजने जोकोविचवर आपला दबाव कायम ठेवला. आपले उत्कृष्ट पदलालित्य, आत्मविश्वास, दमदार सर्व्हिसच्या बळावर त्याने मैदानाच्या उजवीकडे, डावीकडे, नेटजवळ मारलेल्या अचूक फटक्याने जोकोविचला सातत्याने संपूर्ण मैदानभर पळायला लावून त्याची दमछाक केली. त्यामुळे जोकोविचच्या चेहऱयावरील आलेले नैराश्य प्रेक्षकांना सहज नजरेत भरत होते आणि या वर्षी पण अल्कराजच बाजी मारेल याबद्दल कोणाच्या मनात शंका उरली नाही आणि अल्कराज पण या क्रीडा रसिकांच्या इच्छेवर खरा उतरला. आपल्या आक्रमकपणाला त्याने दिलेली अचूकपणाची जोड, भेदक सर्व्हिस यामुळे त्याचा विजय अधिकाधिक सोपा होत गेला. हा तिसऱया सेटमध्ये मात्र जोकोविचने पुनरागमन करण्याचा जबरदस्त प्रयत्न केला आणि सामना बरोबरीमध्ये आणला, तत्पूर्वी नवव्या गेममध्ये अल्कराजने 5-4 अशी आघाडी पण घेतली. पुढे त्याने दहाव्या गेममध्ये 4-0 ने पुढे जाऊन आता विजय मिळवणार अशीच परिस्थिती होती, परंतु एखादा चुकीचा फटका तुमचा विजय कसा लांबवू शकतो हे या गेमने तमाम प्रेक्षकांना दाखवून दिले. जोकोविचने चांगली लढत दिली आणि शेवटी सामना टायब्रेकरवरती गेला. त्यानंतर मात्र आपल्या तरुणपणाची ताकत, वेगवान सर्व्हिस व बॅक हँड फटक्यांचा लीलया वापर करून अल्कराजने टायब्रेकरवरती आपले वर्चस्व निर्माण केले आणि 7-4 असा तिसरा सेट जिंकून आपल्या विम्बल्डनच्या सलग दुसऱया विजेतेपदावरती शिक्कामोर्तब केले, तर एकाच वर्षात फ्रेंच आणि विम्बल्डन स्पर्धा जिंकणारा सहावा खेळाडू व वयाच्या 21 व्या वर्षी चार ग्रँड स्लॅम विजेतेपदे 2022 अमेरिका 2023 विम्बल्डन, 2024 फ्रेंच आणि पुन्हा आताचे विम्बल्डन विजेतेपद मिळवून व विम्बल्डनचा सुवर्ण झळाळीयुक्त चषक आपल्या हातामध्ये उंचावून यापुढे टेनिसचे आपणच सम्राट असणार अशी द्वाही जगभरात फिरवली.

[email protected]