बेडवर लघवी केली म्हणून चिमुरडीच्या प्रायव्हेट पार्टवर अमानुष मारहाण, तिघांना अटक

बेडवर लघवी केली म्हणून अडीच वर्षाच्या मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर मारहाण करत जखमी केल्याची घटना केरळमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. केरळमधील तिरुअनंतपुरममधील बाल कल्याण गृहात ही घटना घडली. बालकल्याण गृहातील केअरटेकरनेच माणुसकीला काळीमा फासणारे हे कृत्य केले.

पीडित चिमुरडीच्या आई-वडिलांचा मृत्यू झाल्याने पाच वर्षाच्या भावंडासह तिला केरळच्या तिरुअनंतपुरममधील बाल कल्याण गृहात ठेवण्यात आले. मुलीने पलंगावर वारंवार लघवी केल्याने केअरटेकर संतापली आणि तिने चिमुकलीच्या प्रायव्हेट पार्टवर चिमट्याने मारहाण करत जखमी केल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी केरळ राज्य बाल कल्याण परिषदेच्या सचिवांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी मुख्य आरोपीसह तिला गुन्ह्यात मदत करणाऱ्या दोघींना अटक केली. अजिता, माहेश्वरी आणि सिंधू अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अजिताने चिमुकलीला मारहाण केली. तर माहेश्वरी आणि सिंधूने गुन्हा लपवण्यासाठी मदत केली. चौथ्या केअरटेकरने मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर जखमा पाहिल्यानंतर ही बाब उघडकीस आली. यानंतर उच्च अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली.

केअरटेकर अजिता, माहेश्वरी आणि सिंधू यांच्यावर लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत प्राणघातक हल्ला आणि गुन्हा लपविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या तिन्ही केअरटेकर अनेक वर्षांपासून कल्याण गृहात काम करत आहेत.