केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे झालेल्या बैठकीनंतर महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा काहीसा सुटला आहे. महायुती सरकारच्या खातेवाटपासंदर्भात मुंबईत आज बैठक होणार होती. मात्र, त्याआधीच कमळाबाईने ठरल्याप्रमाणे गेम केला आणि दिल्लीहून परतताच काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडली. मुख्यमंत्रीपद नाही तर किमान गृहमंत्रीपद मिळेल या आशेवर असलेले एकनाथ शिंदे विश्रांतीसाठी सातारा येथील आपल्या दरे गावी निघून गेले. यामुळे दिल्लीत ठरल्याप्रमाणे मुंबईत होणारी बैठक अचानक रद्द करण्यात आली. यानंतर महायुतीत ते नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, त्यांच्या समर्थकांनी ते नाराज नाहीत, पण अस्वस्थ असल्याची सारवासारव सुरू केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळून आठवडा उलटत आला तरी राज्यात नवं सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. मुख्यमंत्रिपद कुणाला द्यायचं हे निश्चित होत नसल्याने नव्या सरकारचा शपथविधी होत नसल्याचे बोलले जात होते. मात्र गुरुवारी रात्री दिल्लीत झालेल्या महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर भाजपकडेच राहणार असल्याच स्पष्ट करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद स्विकारावे अशी सूचना त्यांना भाजपकडून करण्यात आली आहे. पण, शिंदे गटाला गृहमंत्री, नगरविकास, सार्वजनिक आरोग्य यासारखी महत्वाची खाती हवी आहेत. काही झाले तरी गृहमंत्रीपद दिलं जाणार नसल्याची खात्री पटल्याने शिंदे अस्वस्थ झाले आहेत. यामुळे महायुतीची बैठक ठरलेली असताना ते आपल्या सातार्यातील दरे या गावी निघून गेले.
गृहखाते फडणवीसांकडेच
महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील अशी स्पष्ट चिन्हे आहेत. कोणत्याही परिस्थितीत गृहखाते सोडणार नाही, अशी भूमिका भाजप पक्षश्रेष्ठाRनी घेतली आहे. फडणवीस यांच्याकडेच गृहखात्याचा कारभार राहणार असल्याचा स्पष्ट संदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत देण्यात आला आहे.
चांगल्या हवामानासाठी गावी
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने जो काही निर्णय घेतला आहे तो एकनाथ शिंदे यांनाच माहीत आहे. उपमुख्यमंत्री व्हायचं की नाही हे शिंदेच ठरवतील. त्यांनी सरकारमध्ये रहावं अशी आमची इच्छा आहे. मी खरं सांगतो, तुम्हाला कदाचित पटणार नाही. पण एकनाथ शिंदे यांना ताप होता. सर्दी होती. त्यांची प्रकृती चांगली नाही. पण ते नाराज नाहीत, पण अस्वस्थ आहेत. चांगल्या हवामानासाठी ते गावी गेले आहेत, असे उदय सामंत म्हणाले.
सत्तास्थापनेस सध्या चांगला मुहूर्त नाही
सत्तास्थानेसाठी सध्या मुहूर्त नसून येत्या 2 तारखेपर्यंत कोणताही चांगला मुहूर्त नाही. 2 तारखेनंतर जेव्हा चांगला मुहूर्त असेल तेव्हा सरकार स्थापन होईल, असे दिपक केसरकर म्हणाले. तसेच या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पेंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि सर्व राज्याचे मुख्यमंत्री अशी अनेक लोक उपस्थित राहू शकतात. त्यांच्या सुविधेप्रमाणे सगळे ठरविले जाईल, असेही ते म्हणाले.
5 डिसेंबरला शपथविधी?
महायुतीच्या नव्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी 5 डिसेंबरला होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदानाची चाचपणी केली जात आहे. दादार येथील शिवतीर्थ अर्थात शिवाजीपार्कवर येत्या 2 डिसेंबर रोजी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होण्याचं ठरत होतं मात्र 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे शिवतीर्थ उपलब्ध होणार नाही. त्यामुळे 5 डिसेंबरला आझाद मैदानावर हा शपथविधी होण्याची शक्यता आहे.
2 किंवा 3 डिसेंबरला भाजप आमदारांची बैठक
भाजपचा विधिमंडळ पक्ष नेता निवडीसाठी 2 किंवा 3 डिसेंबरला बैठक होणार आहे. यासाठी दिल्लीतून पेंद्रीय निरिक्षक येणार आहेत. विधिमंडळ नेता निवड झाल्यावर महायुतीच्या आमदारांची संयुक्त बैठक 4 डिसेंबरला पार पडले. यानंतर सत्तास्थापनेचा दावा महायुतीकडून केला जाणार आहे.
जितेंद्र आव्हाड शिंदेंना भेटले
दिल्लीहून परतल्यावर एकनाथ शिंदे हे आज अचानक सातारा जिह्यातील आपल्या मूळ गावी निघून गेले. त्या आधी शिंदे गटाच्या काही आमदारांची त्यांनी भेटही घेतली. विशेष म्हणजे शिंदे हे गावी जाण्याआधी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी वर्षा या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. मात्र या दोन्ही नेत्यांच्या भेटीचे कारण गुलदस्त्यात आहे.
सत्तास्थापनेला विलंब का?
भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी निश्चित झाल्याची चर्चा असली तरी भाजपने अद्याप आपला विधिमंडळ नेता निवडलेला नाही.
भाजपला मुख्यमंत्री पदासह किमान 22 मंत्रिपदे हवी आहेत. तर शिंदे गटाला 10 ते 12 आणि अजित पवार गटालाही 8 ते 10 मंत्रिपदे हवी आहेत.
विधानसभा अध्यक्षपद भाजप आपल्याकडेच ठेवणार आहे. उपाध्यक्षपद अजित पवार गटाकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या सभापती पदासाठी शिंदे गट आग्रही आहे.