संक्रमण शिबिरातील घुसखोरीला चाप लावण्यासाठी म्हाडाने एका खासगी एजन्सीच्या माध्यमातून सुमारे 125 केअरटेकरची नेमणूक केली आहे. तीन शिफ्टमध्ये कार्यरत असलेल्या या केअरटेकरमुळे संक्रमण शिबिरात होणाऱया घुसखोरीला रोखण्यास मदत होणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरात म्हाडाची 34 संक्रमण शिबिरे असून त्यामध्ये सुमारे 20 हजार घरे आहेत. संक्रमण शिबिरातील वाढती घुसखोरी ही म्हाडासाठी डोकेदुखी ठरत आहे. संबंधित घुसखोराला बाहेर काढण्याचे मोठे आव्हान असते. अनेकदा कायदेशीर आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे यापुढे घुसखोरी होऊच नये यासाठी म्हाडाने आता पाऊले उचलली आहे. त्यासाठी एका खासगी एजन्सीच्या माध्यमातून केअरटेकरची नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली.