बॉशचे संस्मरणीय पदार्पण

दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा पहिला डाव 211 धावांत गुंडाळून हिंदुस्थानची धाकधूक आणखीन वाढवली. पण ही कसोटी पदार्पणवीर कार्बिन बॉशसाठी संस्मरणीय ठरलीय. त्याने पदार्पणाच्या पहिल्याच चेंडूवर शान मसूदची विकेट काढल्यानंतर आज त्याने नवव्या स्थानावर फलंदाजी करताना अभेद्य 81 धावांची खेळी करत कसोटी इतिहासात पदार्पणात नवव्या क्रमांकाची सर्वोच्च खेळीचा विश्वविक्रम स्वतःच्या नावावर नोंदवला. एवढेच नव्हे तर पदार्पणात 4 विकेट आणि अर्धशतक ठोकणारा सोळावा अष्टपैलू ठरला आहे. दुसऱ्या दिवसअखेर यजमानांनी पाकिस्तानची 3 बाद 88 अशी अवस्था करत कसोटीवर आपली पकड घट्ट केली आहे.

गुरुवारी बॉशने पाकिस्तानी कर्णधार शान मसूदची विकेट घेत कसोटी पदार्पणात पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा तो 25 वा गोलंदाज ठरला होता. तसेच पाचवा दक्षिण आफ्रिकन गोलंदाज म्हणूनही त्याने मान मिळवला. मात्र आज त्याने संघाची 7 बाद 191 अशी अवस्था असताना नवव्या क्रमांकावर धडाकेबाज खेळ करत 93 चेंडूंत 81 धावा ठोकल्या आणि संघाला 90 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली.