ओबीसींचे नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर मराठा आंदोलकांनी हल्ला चढवला. आंदोलकांनी घोषणाबाजी करत लक्ष्मण हाके यांच्या गाडीची काच फोडली. लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे रिपब्लिकन सेना पक्षाचे उमेदवार चंद्रसेन पाटील सुरनर यांच्या प्रचारार्थ कवठा येथील सभेसाठी जात असताना बाचोटी येथे त्यांच्या गाडीवर हल्ला झाला. आदोंलनकर्त्याविरोधात अद्याप कुठलीच कारवाई केली झाली नसल्याने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती माजी पंचायत समिती सदस्य उतम चव्हाण यांनी दिली आहे.
चंद्रसेन पाटील सुरनर यांच्या प्रचारासाठी लक्ष्मण हाके हे 7 नोव्हेंबर रोजी मतदारसंघात बैठका आणि सभा घेत होते. दिवसभराच्या सभेनंतर कवठा येथील सायंकाळची सभा घेण्यासाठी ते निघाले होते. त्यांच्या सोबत चंद्रसेन सुरनर, माजी पंचायत समिती सदस्य उतम चव्हाण, माधव मुसळै, बबन जोंधळे व इतर गाडीत कार्यकर्ते होते.
मानसपुरी येथे कॉर्नर सभा घेऊन ते बाचोटी मार्गे कवठा येथे जात असताना मराठा आंदोलकांनी हाके यांची गाडी अडवली. काहींनी गाडीच्या बोनेटवर चढून घोषणाबाजी केली. यावेळी लक्ष्मण हाके यांची गाडीही फोडण्यात आली. कसेबसे ते तिथून सुटले आणि सभेच्या ठिकाणी पोहोचले. सभेनंतर चंद्रसेन सुरनर यांनी पोलिसात फिर्याद दिली, मात्र पोलिसांनी कुणालाच अटक केली नाही. यावर आक्षेप घेत फिर्यादींनी आज 11 वाजता पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलनांचा इशारा दिला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.