जालन्यात उभ्या ट्रकला कार धडकली; नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कुटुंबावर काळाचा घाला; चौघांचा मृत्यू,दोन जण गंभीर जखमी

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी देवदर्शन करून परतणाऱ्या जालन्यातील कुटुंबावर काळाने घाला घातला. जालना जिल्ह्यातील सोलापूर- धुळे महामार्गावर अंबड तालुक्यातील महाकाळा फाटा येथे नादुरुस्त असल्याने उभ्या असलेल्या ट्रकला मागून येणारी कार धडकल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

अक्कलकोटवरून गणपूरला जात असलेल्या भाविकांच्या गाडीला अपघात होऊन चार भाविकांचा मृत्यू झाला आहे. मृत एकाच कुटुंबातील असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सोलापूर- धुळे महामार्गावर महाकाळा येथे बुधवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. यात महामार्गावर नादुरुस्त उभ्या असलेल्या ट्रकला बीडकडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी होंडा सिटी कारने पाठीमागून धडकली. अपघातग्रस्त कारमध्ये सहा जण होते. यातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ग्रामस्थांनी गाडी ट्रकबाहेर काढत जखमींना आणि मृतदेहांना बाहेर काढले.

या अपघातात अनिता परशुराम कुंटे (48, रा. छ.संभाजीनगर), भागवत यशवंत चौरे (47), सृष्टी भागवत चौरे (13), वेदांत भागवत चौरे (11, सर्व रा.अंबड रोड, जालना) येथील रहिवाशी आहेत. तर या चारचाकीचा चालक वाचला असून तो जखमी झाला आहे. परशुराम लक्ष्मण कुंटे (55) हे स्वतः गाडी चालवत होते. ते छत्रपती संभाजीनगर येथील रहिवाशी आहेत. तर छाया भागवत चौरे ( 40, रा. अंबड रोड, जालना) या जखमी झाल्या आहेत.

गेल्या आठवड्यात शहागड येथे उभ्या असलेल्या ट्रकला आयसरची धडक बसल्याने दोन जण ठार झाले होते. बुधवारी पुन्हा नादुरुस्त उभ्या असलेल्या वाहनांमुळे चार जणांचा बळी गेला आहे. जखमींना छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी शहागड येथे शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. घटनास्थळी गोंदी पोलीस ठाण्याचे पथक दाखल झाले असून त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.