हिंदुस्थानसह जगभरात गुगल मॅपचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. एखाद्या ठिकाणी जायचं असेल आणि रस्ता माहित नसेल तर अशावेळी गुगल मॅपची हमखास मदत घेतली जाते. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये गुगल मॅपनेच धोका दिल्याची काही प्रकरणे उघड झाल्याने गुगल मॅपच्या अचुकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी गुगल मॅपमुळे तीन लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. आता पुन्हा एकदा असेच प्रकरण समोर आले असून एक गाडी थेट कालव्यात पडली आहे. या गाडीमध्ये तीन जण प्रवास करत होते.
उत्तर प्रदेशातील बरेली शहरामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेसंदर्भात अधिक माहिती इज्जत नगर पोलीस स्टेशनचे प्रभारी धनंजय पांडे यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, औरेया येथील रहिवासी प्रताप सिंह त्याच्या इतर दोन सहकाऱ्यांसोबत टाटा टॅगोर या गाडीमधून पिलीभीत या ठिकाणी जात होते. यासाठी त्यांनी गुगल मॅपची मदत घेतली. मात्र कालापूर येथील बारकापूर गावातील कालव्या शेजारील रस्ता तोडण्यात आला होता. याच ठिकाणी मॅपच्या भरवशावर निघालेल्या प्रताप सिंह यांना मॅपने धोका दिला आणि त्यांची गाडी थेट कालव्यात पडली. सुदैवाने या दुर्घटनेत गाडीमधून प्रवास करणाऱ्या तिघांना जास्त इजा झाली नाही. गावकऱ्यांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर गाडी क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आली.
काहीच दिवसांपूर्वी 24 नोव्हेंबरला बदायू येथील दातागंजवरून बरेलीच्या फरीदपूर या मार्गावर असणाऱ्या मुडा गावाजवळ अर्धवट बनवण्यात आलेल्या पुलावरून गाडी रामगंगा नदीत पडल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी दातागंज नायब तहसीलदारांनी पाच अभियंत्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी गुगलला सुद्धा नोटीस पाठवली आहे.