शिरूरच्या न्हावरेजवळ कार-कंटेनरची भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

न्हावरे (ता. शिरूर, जि. पुणे) या गावचे हद्दीत तळेगाव ढमढेरे ते न्हावरे मार्गावर रविवारी रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास कार-कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातत तिघांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताबाबत रविंद्र महादेव सोनवणे यांनी शिरूर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. अपघातानंतर कंटेनरचालकाने पळ काढला आहे. या भीषण अपघातात कैलास कृष्णाजी गायकवाड (वय 49 ), गौरी कैलास गायकवाड (वय 20,रा. निवाळकर वस्ती, न्हावरे ता शिरूर जि पुणे), गणेश महादेव नेर्लेकर (वय 23, रा. कोकणगाव ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर) यांचा मृत्यू झाला असून दुर्गा कैलास गायकवाड (वय 45, निबाळकर वस्ती, न्हावरे) या गंभीर जखमी झाल्या आहेत.

या अपघाताबाबत शिरूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास मौजे न्हावरे ता. शिरूर जि पुणे या गावचे हद्दीत कैलास कृष्णाजी गायकवाड स्वीप्ट कारने वाघोली पुणे येथून न्हावरेकडे येत असताना ढमढेरे ते न्हावरे मार्गावर हा अपघात झाला. स्विष्ट कारमध्ये कैलास यांच्यासह त्यांची पत्नी दुर्गा कैलास गायकवाड आणि मुलगी गौरी कैलास गायकवाड व चुलत मेव्हणे गणेश महादेव नेर्लेकर होते.

या कारला न्हावरेकडून तळेगावकडे येणाऱ्या कंटेनरने धडक दिली. कंटेनर चालकाने निष्काळजीपणाने भरधाव कंटेनर चालवल्याने अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर कंटेनर चालकाने पळ काढला आहे. पुढील तपास शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भोते करीत आहेत.