आज केपटाऊनचे न्यूलॅण्ड्स फलंदाजांसाठी ‘चेपटाऊन’ ठरले. दोन्ही संघाच्या गोलंदाजांनी हुकूमत गाजवताना 23 फलंदाजांना अवघ्या 270 धावांत चेपले. त्यामुळे दुसऱयाच कसोटीच्या पहिल्या दिवशी उभय संघाचे 23 विकेट पडल्या असून कसोटी सामन्यावर दुसऱयाच दिवशी संपण्याची नामुष्की ओढावली आहे. मोहम्मद सिराजच्या त्सुनामीमुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ 55 धावांतच उडाला. मग हिंदुस्थानचा डावही अनपेक्षितपणे 153 धावांवर आटोपला. मग पहिल्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेची 3 बाद 62 अशी अवस्था झाल्यामुळे ते अद्याप 36 धावांनी पिछाडीवर आहेत.
आजची कसोटी खऱया अर्थाने फलंदाजांची कसोटी पाहणारी ठरली. सिराजच्या भेदकतेपुढे दक्षिण आफ्रिकन फलंदाजांचा पालापाचोळा झाल्यानंतर एनगिडी-रबाडाने हिंदुस्थानी डावाला गुंडाळण्याचा करिश्मा केला. दोन्ही संघाचे डाव आटोपल्यामुळे पहिल्याच दिवशी 23 विकेट पडले आणि कसोटी इतिहासात नवा इतिहास रचला गेला. कसोटी इतिहासात एका दिवसात 23 विकेट बाद होण्याची ही सहावीच वेळ आहे.
मोहम्मद सिराजचे वादळ
डावाच्या चौथ्याच षटकात सिराजचे वादळ घोंघावले. त्याने एडन मार्करमला (2) बाद करताच हिंदुस्थानी संघात चैतन्य संचारले होते, पण त्या चैतन्याचे क्षणार्धात वादळात रूपांतर झाले. मार्करमनंतर पुढच्याच षटकात शेवटची कसोटी खेळत असलेला कर्णधार डीन एल्गरचा (4) त्रिफळा उडवला. बुमराने स्टब्जला (3) बाद करत आपलेही काम केले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची 3 बाद 11 अशी अवस्था झाली. मात्र त्यानंतर सिराजने टोनी, बेडिंगहॅम, यान्सन आणि वेरीन यांना झटपट बाद करत यजमानांची 7 बाद 45 अशी भीषण अवस्था केली. दक्षिण आफ्रिकेवर ‘सिराजरूपी’ सुल्तानी संकट कोसळल्यानंतर त्यांना कुणीच फलंदाज वाचवू शकला नाही. सिराजने आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना 15 धावांत 6 विकेट्स टिपण्याचा पराक्रम केला. मग उर्वरित 3 विकेट मुकेश कुमार आणि बुमराने टिपत दक्षिण आफ्रिकेचा डाव 55 धावांत गुंडाळला.
तरीही आजची कामगिरी आठवी
दक्षिण आफ्रिकेचा डाव 55 धावांत आटोपला असला तरी कसोटी इतिहासात त्यांचा हा आठव्या क्रमांकाचा नीचांक आहे. याआधी ते चक्क सातवेळा पन्नाशीतच बाद झाले आहेत. 19 व्या शतकाच्या शेवटी ते चारदा 30, 35, 43 आणि 47 या धावांवर बाद झाले होते तर 1924 आणि 1932 साली झालेल्या कसोटीतही ते 30, 36 आणि 45 धावांत त्यांचा खुर्दा पाडला होता. कसोटी इतिहासात सर्वाधिक सातवेळा पन्नाशीत बाद होण्याचा विक्रम त्यांच्याच नावावर आहे.
सहा विकेट्स शून्यावर बाद
दक्षिण आफ्रिकेचा डाव 55 धावांत संपवल्यावर हिंदुस्थानला मोठी आघाडी घेण्याची सुवर्णसंधी होती. जैसवालची सलामी अयशस्वी ठरली असली तरी त्यानंतर रोहित शर्मा-शुबमन गिलने 55 धावांची भागी रचली. मग गिल आणि कोहलीने 33 धावांची भर घातली. विराट कोहलीने के. एल. राहुलच्या साथीने पाचव्या विकेटसाठी 48 धावांची भागी रचत संघाला दीडशेचा टप्पाही ओलांडून दिला होता. तेव्हा हिंदुस्थान 4 बाद 153 असा सुस्थितीत होता, पण एनगिडीने केएल राहुलला बाद करून ही जोडी फोडली आणि त्यानंतर हिंदुस्थानी संघावर वीज कोसळली. अवघ्या 9 चेंडूंत हिंदुस्थानचा अर्धा संघ शून्यावर बाद झाला आणि 4 बाद 153 वर असलेला हिंदुस्थान सर्वबाद 153 झाला. एनगिडीने आपल्या एका षटकात राहुल, जाडेजा आणि बुमराला बाद केले तर पुढच्या षटकांत रबाडाने कोहली आणि कृष्णाला बाद केले तर सिराज धावबाद झाला.
हिंदुस्थानचा शून्याचा विश्वविक्रम
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आज हिंदुस्थानने शून्यावर बाद होण्याचा दुर्दैवी विश्वविक्रम आपल्या नावावर नोंदवला. आज पहिल्या दिवशी पहिल्याच डावात हिंदुस्थानचे सहा फलंदाज शून्यावर बाद झाले. कसोटी इतिहासात आतापर्यंत आठवेळा एका डावात सहा फलंदाज शून्यावर बाद झाले आहेत. ही कामगिरी हिंदुस्थानने दुसऱयांदा केली. तसेच हिंदुस्थानच्या डावात सात फलंदाजांना आपल्या धावांचे खाते उघडता आलेले नाही. हासुद्धा एक विक्रमच आहे. कसोटी इतिहासात एका डावात सात फलंदाज शून्यावर असण्याचीही पहिलीच वेळ आहे.