पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच रशिया दौऱ्यावर गेले होते. येथे त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली. यावरून अमेरिकेने आदळआपट केली असून हिंदुस्थानातील अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिंदुस्थान-अमेरिकेचे संबंध घट्ट आहेत, पण इतके घट्ट नाहीत की ज्याला हलक्यात घेतले पाहिजे, असे ते म्हणाले.
नवी दिल्लीत एका डिफेन्स कॉन्क्लेवमध्ये बोलताना एरिक गार्सेटी म्हणाले की, हिंदुस्थानला धोरणात्मक स्वातंत्र्य आवडते, परंतु युद्धभूमीवर याला काही अर्थ नाही. संपूर्ण जग एका साखळीत गुंफलेले असून आता युद्धापासून कोणीही दूर नाही. त्यामुळे फक्त शांततेसाठी उभे राहून चालणार नाही, तर अशांतता निर्माण करणाऱ्या देशांवर कारवाईही करावी लागेल.
संकटाच्या वेळी अमेरिका आणि हिंदुस्थानला एकत्रितपणे हे जाणून घेणे आवश्यक आहे. या नात्याला काय नाव द्यायचे हे माहिती नाही, परंतु आपण एक विश्वासार्ह मित्र, भाऊ, सहकारी असून गरजेच्या वेळी एकत्र काम करूया, असेही गार्सेटी म्हणाले.