शुक्रवारी महायुती सरकारने राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र हा अर्थसंकल्प म्हणजे लबाडाघरचे निमंत्रण असल्याची टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. ही टीका जिव्हारी लागल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चांगलीच चरफड झाली. यातून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. राज्याच्या जनतेने त्यांचे नेतृत्व, त्यांचा पक्ष आणि त्यांच्या आघाडीला झिडकारून लावले आहे. फडणवीस स्वत:ला नाना फडणवीस यांचे भाऊ समजत होते, पण तसे नाहीय. नाना फडणवीस हे साडेतीन शहाण्यांपैकी एक होते. त्या साडेतीन शहाण्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांना स्थान नाही, असा घणाघात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.
लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांना महायुतीत ठेऊ नका अशी मागणी भाजपा नेते, कार्यकर्त्यांकडून होत आहे. यावरही खासदार संजय राऊत यांनी भाष्य करत भाजपाचा समाचार घेतला. ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ हे भाजपाचे कायम धोरण राहिले आहे. महाराष्ट्रच नाही तर देशभरात भाजपचे हे धोरण आहे. शिवसेनेने 25 वर्ष त्यांच्यासोबत काम केले. आम्ही जो अनुभव घेतला तो देशभरात इतरांनीही घेतला. आंध्र प्रदेशात जगन मोहन रेड्डी, ओडिशात नवीन पटनायक यांनीही हा अनुभव घेतला. अनेक ठिकाणी भाजपने लोकांना गरजेपुरते वापरून घेतले आणि गरज संपल्यावर फेकून दिले, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.
राज्यात सुरू असलेल्या मराठा-ओबीसी संघर्षावरूनही संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. मनोज जरांगे-पाटील त्यांच्या, तर इतर नेते ओबीसी समाजासाठी काम करत आहेत. पण हा संघर्ष महाराष्ट्रात यापूर्वी कधीच झाला नव्हता. गेल्या काही वर्षात, विशेषत: देवेंद्र फडणवीस यांच्या हाती राज्याची सूत्र गेल्यावर हा संघर्ष सुरू झाला का? हा तपासाचा विषय आहे. यापूर्वीही राज्यात प्रत्येक समाजाच्या काही मागण्या होत्या. त्यासाठी लोकं संघर्ष करत राहिले, सरकारकडे पाठपुरावा करत राहिले, न्यायालयातही प्रकरण गेले. पण भाजपाने फडणवीस यांच्या हाती राज्याचे नेतृत्व दिल्यानंतर त्यांनी जातीय आगी लावण्याचे काम केले आणि महाराष्ट्र खतम करून टाकला, अशा शब्दाच राऊत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.
दरम्यान, सरकार एक रुपयात शेतकऱ्यांना विमा देऊ म्हणते, पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे पत्रकारांनी विचारले असता राऊत म्हणाले की, हे सरकार बोगस, डुप्लिकेट आहे. हे सरकार म्हणजे मोदी-शहांची नकली संतान आहे. ते अशाच डुप्लिकेट पद्धतीने वागणार. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अर्थसंकल्प मांडला. जनतेच्या पैशाने मतं विकत घेण्याचा प्रकार ते करत आलेले आहेत. लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघात लाखो मतं त्यांनी विकत घेतली आणि काही ठिकाणी विजयही प्राप्त केला. आताही जनतेच्या पैशाने मतं घ्यायचा प्रकार सुरू आहे. वारकऱ्यांनाही विकत घेण्याचा प्रयत्न केला. वारकऱ्यांच्या स्वाभिमानावर घाला घालण्याचा प्रयत्न सरकारने केला. प्रत्येक गोष्ट विकत घ्यायची हे मोदी-शहांचे घोरण असून तेच महाराष्ट्रातले घटनाबाह्य सरकारने राबवले आहे.
सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा स्ट्राईक रेट सर्वाधिक महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील अमरावतीत सर्वाधिक आत्महत्या झाल्या असून गेल्या वर्षभरात येथे 2800 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे ऑन रेकॉर्ड आहे. एकनाथ शिंदे सारखे आमचा स्ट्राईक रेट… स्ट्राईक रेट करतात, पण देशात सर्वाधित शेतकरी आत्महत्यांचा स्ट्राईक रेट महाराष्ट्राचा आहे, अशी खंतही राऊत यांनी बोलून दाखवली.
अर्थसंकल्प केवळ शब्दांचा फुलोरा; शरद पवार यांचा मिंधे सरकारला टोला
महाराष्ट्रात 175-180 जागा जिंकू!
दरम्यान, महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळेल. निवडणुकीला सामोरे जाताना चेहरा असावा हे आमचे मत आहे. आपण कोणासाठी मतदान करतोय हे लोकांना कळायला हवे. लोकांनी इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरेंद्र मोदींना मतदान केले. पण तीन पक्ष आणि इतर लहान घटकपक्ष एकत्र असल्यामुळे चेहरा कोण याच्याविषयी आमच्यात मतभेद नाहीत. लोकसभेला आम्ही तिघांनी एकत्र निवडणूक लढवली, आणि महाराष्ट्रात काय निकाल लागला हे सर्वांनी पाहिले. त्यामुळे आम्ही कोणत्याही परिस्थितीत एकत्र लढू आणि 175-180 जागा जिंकू, असा ठाम विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.
जय संविधान घोषणेमुळे भाजपाला पोटशूळ का?
शशी थरूर यांनी खासदारकीची शपथ घेताना ‘जय संविधान’ म्हटल्याने लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी रोखले. ओम बिर्ला हे घटनात्मक पदावर असून त्यांना संविधानाचा इतका तिटकारा का? भाजपची लोकं धार्मिक घोषणा देत होते. त्यांनी त्यावर, जॅय पॅलेस्टाईन म्हणणाऱ्यांवर आक्षेप घेतला नाही. जय संविधान ही धर्मनिरपेक्षा घोषणा आहे. ही आदरयुक्त घोषणा केली तर भाजपाला एवढा पोटशूळ उठण्याचे कारण काय? भाजप कायम संविधान विरोधी राहिलेला पक्ष आहे. लोकसभेत ते 240 पर्यंत घसरले नसते तर देशाचे संविधान नव्याने लिहिण्याची योजना त्यांनी आणखी होती. देशाचे संविधान नव्याने लिहून नवीन घटनाकार नरेंद्र मोदी असे त्या संविधानाच्या पुस्तकावर येण्याची दाट शक्यता होती. पण इंडिया आघाडीने देशाच्या जनतेच्या मदतीने संविधान बदलण्याचा आणि आंबेडकरांचे संविधान खतम करण्याचा डाव उधळून लावला. याचा त्यांना प्रचंड राग आलेला आहे, असेही राऊत म्हणाले.
View this post on Instagram