दिल्ली, जबलपूरनंतर राजकोट विमानतळावरील टर्मिनलचं छत कोसळलं, 3 दिवसातील तिसरी घटना

दिल्ली, जबलपूरनंतर आता गुजरातमधील राजकोटमध्ये विमानतळाचे छत कोसळले आहे. राजकोट विमानतळाच्या छताचा भाग शनिवारी दुपारी कोसळला. ‘पीटीआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.

मुसळधार पावसामुळे राजकोट विमानतळाच्या टर्मिनल बाहेर पॅसेंजर पिकअप आणि ड्रॉप भागातील छत कोसळले. जुलै 2023मध्ये याचे लोकार्पण झाले होते. सुदैवाने ही घटना घडली तेव्हा तिथे कोणीही उपस्थित नव्हते. अन्यथा दिल्लीसारखी परिस्थिती ओढावली असती.

शुक्रवारी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-1 च्या छताचा भाग कोसळला. या दुर्घटनेत 1 महिला ठार, तर सहा जण जखमी झाले. छताचा खाली आलेला भाग वाहनांवर कोसळल्यामुळे काही कॅब आणि मोटारी पार चेपल्या गेल्या होत्या.

पहाटे साडे पाचच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेनंतर विमानतळावर प्रचंड गोंधळ उडाला होता. दुपारी 2 वाजेपर्यंतची सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली. मृत महिलेच्या कुटुंबीयांना 20 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 3 लाखांची भरपाई हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी जाहीर केली.

दिल्ली विमानतळाचे छत कोसळले; पार्किंग लॉटमध्ये उभ्या गाडय़ांमधील 6 प्रवासी जखमी, 1 महिला ठार

तत्पूर्वी जबलपूर विमानतळावरही अशीच घटना घडली. जबलपूर विमानतळासाठी 450 कोटी खर्च झाले. मोदींनी 10 मार्च 2024 रोजी या विमानतळाचे उद्घाटन केले होते. या विमानतळ छताचा भाग मध्यंतरी तुटून खाली आला होता.