भावी पोलिसांना ब्लूटूथ कॉपी पुरवणाऱ्या ‘रुस्तमजीं’ना बेड्या

चित्रपटात मुन्नाभाईला एमबीबीएस बनण्यासाठी रुस्तमजी मोबाईल कॉलवरून मदत करतानाचा सीन सगळ्यांच्याच परिचयाचा आहे. असाच काहीसा प्रकार पेण व अलिबागच्या पोलीस भरतीदरम्यान उघडकीस आला आहे. 10 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या पोलीस भरती लेखी परीक्षेदरम्यान सहा उमेदवारांना ब्लूटूथद्वारे कॉपी करताना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. या कॉपीबहाद्दर भावी पोलिसांना मदत करणाऱ्या दहा जणांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे.

रायगड जिल्ह्यातील पेण व अलिबाग विभागीय 391 पोलीस शिपाई जागांसाठी लेखी परीक्षा प्रक्रिया 10 ऑगस्ट 2024 रोजी पार पडली. या लेखी परीक्षेत एकूण 4 हजार 747 महिला व पुरुष उमेदवार सहभागी झाले होते. ही भरती प्रक्रिया पारदर्शी पार पाडावी यासाठी परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. यावेळी अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चार परीक्षा केंद्रामधून पाच उमेदवार व पेण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परीक्षा केंद्रातून एका उमेदवाराला कानात ब्लूटूथ लावून कॉपी करताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. या परीक्षार्थांना मदत करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी कोकण परिक्षेत्र, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या मागादर्शनाखाली विशेष तपास पथक व सायबर पथक नेमण्यात आले होते. या पथकाने कसोशीने तपास करून या दहा जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

तपास पथकांची कामगिरी

विशेष तपास पथकांनी या प्रकरणाचा उलगडा करत अवघ्या एक महिन्यात पवन बमनावत (25, जालना), नारायण राऊत (29, बीड), प्रताप उर्फ भावड्या गोमलाडू (25, संभाजीनगर), नागम्मा इबिटदार (20, नांदेड), अर्जुन बेडवाल (24, संभाजीनगर), मंगेश चोले उर्फ चोरमले (34, लातूर), संतोष गुसिंगे (30, संभाजीनगर), पूनम वाणी (23, संभाजीनगर), जीवन नायमने उर्फ एस. राठोड उर्फ करण जाधव (संभाजीनगर), जालिंदर काळे (32, बीड) या दहा जणांना अटक केली आहे.