राजस्थानात बनतेय कर्करोगाची लस; किंमत फक्त 10 हजार रुपये

कर्करोगावर उपचार करणे म्हणजे भरमसाट खर्च आलाच. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये या उपचाराचा खर्च तब्बल 25 लाख रुपये आहे. परंतु आता केवळ 10 हजारांत कर्करोगावर उपचार करणे शक्य होणार आहे. कारण राजस्थानात पहिल्यांदाच स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून कर्करोगावर लस विकसित केली जात आहे. ही लस केवळ 10 हजार रुपयांत उपलब्ध होणार आहे. जयपूर येथील महात्मा गांधी मेडिकल कॉलेजला डेंड्रिटिक सेल लस तयार करण्याची परवानगी मिळाली आहे. या लसीमुळे पाच प्रकारच्या कर्करोगावर उपचार करणे शक्य होईल. ही कर्करोगावरील देशातील पहिली लस असल्याचा दावा केला जात आहे. तब्बल 27 वर्षांच्या संशोधनानंतर हे यश आले आहे.

2027 पर्यंत बाजारात

1998 मध्ये ही कर्करोगाची लस शोधून काढण्यात आली. गेल्या 27 वर्षांपासून त्यावर काम सुरू आहे. सर्व संशोधन पेटंट आमच्या मालकीचे असून ही लस 2027 पर्यंत बाजारात येऊ शकते, असे डॉ. अनिल सुरी यानी सांगितले. ही लस सध्या फेज-2 मध्ये असून पहिल्या टप्प्यात सुरक्षा मानके तपासण्यात आली.

अशी तयार होणार लस

रुग्णाच्या शरीरातून डेंड्रिटिक पेशी काढून टाकल्या जातात. डेंड्रिटिक पेशी ही रोगप्रतिकारक शक्तीमध्ये असलेल्या पांढऱ्या रक्त पेशींचा एक प्रकार असून हे रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय करण्यास मदत करतात. लस तयार करण्यासाठी रुग्णाच्या रक्तातून डेंड्रिटिक पेशी काढल्या जातात. पहिल्या टप्प्यात या डेंड्रिटिक पेशींना प्रयोगशाळेत कर्करोगाच्या पेशींच्या संपका&त आणून कर्करोग ओळखण्यास शिकवले जाते. त्यांना टय़ूमर अँटीजेन्सने प्रशिक्षित केले जाते जेणेकरून ते कर्करोगाच्या पेशी ओळखू शकतील.