Plane Crashed – कॅनडाच्या टोरंटो विमानतळावर मोठा अपघात; लॅण्डिंग दरम्यान विमान क्रॅश, बर्फामुळं जाग्यावर पलटी झालं

कॅनडा येथील टोरंटोच्या पीयर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक मोठा विमान अपघात झाला आहे. विमान लॅण्डिंग दरम्यान डेल्टा एअरलाईन्सचे एक विमान क्रॅश झाले आहे. विमान लँडिंगसाठी खाली येताच बर्फाळ जमिनीमुळे ते उलटले. या अपघातात 19 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले तर इतर सात जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.

एअरलाइनने एक्सवर या घटनेची पुष्टी केली असून मिनियापोलिसहून आलेल्या डेल्टा फ्लाइटमध्ये एक दुर्घटना घडली. लँडिंग दरम्यान विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते उलटले. त्यात 76 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते.या घटनेत 19 जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले, तर सात जणांना किरकोळ दुखापत झाली. मिनियापोलिसने आलेल्या सर्व प्रवासी आणि क्रू सदस्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. एबीसी न्यूच्या वृत्तानुसार, विमान नेमके कसे उलटले आणि आग कशी लागली याबाबत आणि अपघाताची अन्य कारणे तपासली जात असल्याचे सांगण्यात आले.

क्रॅश लँडिंगनंतर तातडीने आपत्कालीन पथकांनी बचाव कार्य सुरु केल्याचे टोरंटो पियर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळाकडून सांगण्यात आले. “टोरंटो पियर्सनला मिनियापोलिसहून येणाऱ्या डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाच्या लँडिंग दरम्यान घडलेल्या घटनेची माहिती आहे. आपत्कालीन पथके मदत करत आहेत. सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्सना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.” असे ट्विटरवर पोस्ट शेअर करत एअरलाइनने माहिती दिली.

या अपघाताचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. ज्यामध्ये विमान बर्फाळ जमिनीवर उतरताना दिसत आहे. काही वेळातच त्यातून धूर निघू लागला आणि अचानक आग लागली. यावेळी सर्वत्र काळा धूर पसरल्याचे दिसत आहे.