ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरमुळे अमेरिकेचे मोठे नुकसान, 88 F35 लढाऊ विमानांचा करार कॅनडा करणार रद्द?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या 25 टक्के करांमुळे कॅनडा आता अमेरिकन एफ-35 स्टेल्थ लढाऊ विमानांना पर्याय शोधत आहे. याबाबत बोलताना कॅनडाचे संरक्षण मंत्री बिल ब्लेअर म्हणाले आहे की, देशाच्या हवाई दलाने ते स्वीकारण्याची शिफारस केली आहे. परंतु ते इतर पर्यायांवर देखील विचार करत आहेत. पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या नवीन मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे. याआधी पोर्तुगालनेही एफ-35 विमानांचा करार रद्द करण्याचे संकेत दिले आहेत. या दोन्ही देशांनी हे करार रद्द केल्यास अमेरिकेचे मोठे नुकसान होऊ शकते.

अनेक वर्षांच्या चर्चेनंतर 2023 मध्ये कॅनडाने अमेरिकेसोबत F-35 स्टेल्थ स्टेल्थ लढाऊ विमानांचा करार अंतिम केला होता. त्याच वर्षी जूनमध्ये कॅनडाने लॉकहीड मार्टिनसोबत 88 विमानांसाठी 19 अब्ज डॉलर्सचा करार केला. या लढाऊ विमानाचा करार माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या कार्यकाळात झाला होता. मात्र आता कॅनडाच्या नवीन सरकारने हा करार रद्द करण्याचे संकेत दिले आहेत.