कॅनडास्थित गॅंगस्टर आणि लॉरेन्स बिश्नोईचा निकटवर्तीय गोल्डी ब्रारवर सरकराने कारवाईचा बडगा उगारला आहे. केंद्र सरकारने गोल्डी ब्रारला बेकायदा कृत्याविरोधी प्रतिबंध कायद्याअंतर्गत (UAPA) दहशतवादी घोषित केले आहे.
कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा निकटवर्तीय असणाऱ्या गोल्डी ब्रारला केंद्र सरकराने बेकायदा कृत्यप्रतिबंध कायद्याअंतर्गत (UAPA) दहशतवादी घोषित केले आहे. गोल्डी ब्रार हा पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या खून प्रकरणाचा मास्टरमाईंड मानला जातो. त्याच्या सांगण्यावरुनच बिश्णोई टोळीच्या गुंडांनी सिद्धू मुसेवालाची हत्या केली होती.
गृहमंत्रालयानं गोल्डी ब्रारबाबत एक पत्रक जाहीर केलं आहे. त्यात म्हंटल आहे की,”गोल्डी ब्रारचे प्रतिबंधित खलिस्तानी संघटना बब्बर खालसाशी संबंध आहेत. सीमेपलीकडे दहशतवादी संघटनांचा गोल्डीला पाठिंबा असून अनेक हत्यांशी त्याचा संबंध आहे. पंजाबमधील शांतता, कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा कट गोल्डी ब्रार आणि त्याच्या सहकाऱ्यांकडून रचण्यात येत आहे. त्यात दहशतवादी कारवाया करणे, हत्या करणे आणि अन्य कृत्यांचा सहभाग आहे. तसेच, गोल्डी ब्रार सीमेपलीकडून ड्रोनमार्फत शस्त्रे, दारुगोळा, स्फोटकांसाठी साधनं पुरवत होता.
केंद्रीय तपास यंत्रणा एनआयएने परदेशातून चालवल्या जाणाऱ्या टोळ्यांच्या दीर्घ तपासानंतर एक यादी तयार केली आहे. यादीमध्ये देशाच्या सुरक्षेला धोका असलेल्या सुमारे 28 कुख्यात गुंडांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. या यादीत प्रामुख्याने पंजाब, दिल्ली, हरियाणा, राजस्थानसह अनेक राज्यांतील कुख्यात गुंडांची नावे आहेत. ही यादी केंद्रीय गृहमंत्रायलाकडे सोपवण्यात आली आहे. हे सर्व गुंड देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी आहेत.
गँगस्टर गोल्डी ब्रारचे खरे नाव सतींदर सिंग उर्फ सतींदर सिंगजीत सिंग आहे. 11 एप्रिल 1994 रोजा त्याचा जन्म झाला असून तो पंजाबच्या श्री मुक्तसर साहेबाचा रहिवासी आहे. 2021 मध्ये तो हिंदुस्थानातून कॅनडाला पळून गेला होता. तेव्हापासून तो कधी कॅनडा तर कधी अमेरिकेत राहून गुन्हेगारी व दहशतवादी कारवायांमध्ये सक्रीय आहे. सध्या तो ब्रॅम्प्टन, कॅनडा या ठिकाणी राहत असून खलिस्तानी दहशतवाद्यांशी संगनमत करुन हिंदुस्थानविरोधी काम करत आहे. कॅनडामध्ये बसून त्याने पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा संपुर्ण कट रचला होता. सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर त्याने सोशल मिडीयावर घोषणा करुन हत्येची जबाबदारी स्वीकारली होती.