कॅनडात 21 वर्षीय हिंदुस्थानी विद्यार्थिनीचा गोळीबारात मृत्यू

कॅनडात बस स्टॉपवर बसची वाट पाहत उभ्या असलेल्या 21 वर्षीय हरसिमरत रंधावा या हिंदुस्थानी विद्यार्थिनीचा गोळीबारात मृत्यू झाला.

ओंटारिओमधील हॅमिल्टन येथे कारमधील एका व्यक्तीने दुसऱ्या वाहनाच्या दिशेने गोळीबार केला असता एक गोळी हरसिमरतला लागली. ती येथील मोहॉक महाविद्यालयात शिक्षण घेत होती. टोरंटो येथील हिंदुस्थानच्या वाणिज्य दूतावासाने ‘एक्स’च्या माध्यमातून या घटनेवर दुःख व्यक्त केले. दोन वाहनांतून एकमेकांवर गोळीबार सुरू असताना बुधवारी सायंकाळी एका गोळीने निष्पाप हरसिमरतचा जीव घेतला. गेल्या चार महिन्यांत हिंदुस्थानातील चौथ्या विद्यार्थिनीचा कॅनडात मृत्यू झाला आहे. स्थानिक हॅमिल्टन पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अप्पर जेम्स आणि साऊथ बेंड रस्त्यावर दोन वाहनांतून एकमेकांवर गोळय़ा झाडण्यात आल्या. त्यातील एक गोळी हरसिमरतच्या छातीला लागली. तिला रुग्णालयात दाखल केले, पण डॉक्टरांनी मृत घोषित केले.