शहरी गरीब योजनेची धावाधाव थांबणार; लाभार्थी वाढणार, आशा वर्कर्स करणार सर्वेक्षण

रुग्णालयात रुग्ण दाखल केल्यानंतर शहरी गरीब योजनेचे कार्ड काढण्यासाठी नागरिकांकडून महापालिकेत धावपळ केली जाते. अशा वेळी रुग्णाला मोफत उपचार मिळविण्यात अडचणी येतात. याबाबत नागरिकांकडून आरोग्य विभागाकडे सातत्याने तक्रारी प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून आता शहरी गरीब योजनेचे लाभार्थी वाढविण्यासाठी अभियान राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर पालिकेच्या रुग्णालयांमध्ये कार्ड काढण्यासाठी मदत केली जाणार आहे. तसेच आशा वर्कर्सद्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे.

शहरातील आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबांसाठी महापालिकेकडून 2011 पासून शहरी गरीब वैद्यकीय साहाय्य योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत कार्डधारकांना खासगी रुग्णालयांत उपचार घेण्यासाठी एक लाखापर्यंत आर्थिक मदत मिळते. तसेच किडनी, हृदयरोग व कॅन्सर यासारख्या दीर्घकालीन आजाराच्या उपचारासाठी दोन लाखांपर्यंत मदत मिळते. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 60 हजार रुपये आहे, अशा कुटुंबातील व्यक्तींना महापालिकेच्या पॅनलवरील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी वर्षाला एका कुटुंबासाठी एक लाखापर्यंत आर्थिक मदत मिळते.

तसेच डायलेसिस व कॅन्सर आजाराच्या रुग्णांस दोन लाख रुपये मदत मिळते. ही योजना नागरिकांसाठी लाभदायक ठरत असल्याने वर्षाला 4 कोटींच्या तरतुदीपासून सुरुवात झालेल्या योजनेचा खर्च 50 कोटींच्या पुढे गेला आहे.

दरम्यान, गेल्या 13 वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी महापालिकेकडे केवळ 18 हजार कुटुंबप्रमुखांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी 15 हजार 535 नागरिकांना योजनेचे सभासद कार्ड वाटप करण्यात आले आहे. शहराची लोकसंख्या पाहता योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या नगण्य आहे. अनेकदा नागरिकांच्या नातेवाईकांद्वारे रुग्ण दवाखान्यात दाखल केल्यानंतर योजनेचे सभासद कार्ड काढण्यासाठी धावाधाव केली जाते. शहरी गरीब योजनेचे कार्ड नसल्याने संबंधित दवाखान्यात रुग्णाला योजनेचा लाभ दिला जात नाही. अशा हजारो तक्रारी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे येत असतात. त्यामुळे शहरातील गरजू लोकांना या योजनेचा लाभ देण्यासाठी आता महापालिकेच्या आरोग्य विभागाने अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानांतर्गत सर्वप्रथम आशा वर्कर्सच्या माध्यमातून घरोघरी जाऊन सर्व्हे केला जाणार आहे. यामध्ये योजनेस पात्र ठरणाऱ्या कुटुंबाला योजनेचे कार्ड काढून देण्यासाठी मदत केली जाणार आहे. यासाठी आशा वर्कर्सची कार्यशाळा घेतली जाणार आहे.