
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी एक महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे की, एखाद्या व्यक्तीला ‘मियाँ-तियाँ’ आणि ‘पाकिस्तानी’ म्हणणं खालच्या पातळीचं (poor taste) असेल, परंतु त्याच्या धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा मात्र ठरणार नाही.
हिंदुस्थानच्या दंड संहितेच्या कलम 298 (धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने जाणूनबुजून शब्द उच्चारणे इत्यादी) अंतर्गत व्यक्तीला दोषमुक्त करत न्यायालयाने म्हटले आहे की, ‘अपीलकर्त्यावर ‘मियाँ-तियाँ’ आणि ‘पाकिस्तानी’ असं संबोधून त्याच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे’. निःसंशयपणे, त्याने केलेलं विधान खालच्या पातळीचं आहे. मात्र तरी देखील ते विधान धार्मिक भावना दुखावणारे ठरवता येणार नाही’.
न्या. बी. व्ही. नागरथना आणि सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठासमोर झारखंड उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध दाखल केलेल्या अपीलावर सुनावणी करत होते. झारखंड उच्च न्यायालयाने अपीलकर्त्याला दोषमुक्त करण्यास नकार दिला होता.
चास येथील उपविभागीय कार्यालयात उर्दू अनुवादकर्ता आणि लिपिक (माहिती अधिकार) पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीने FIR दाखल केला होता. तक्रारदाराने आरोप केला होता की जेव्हा तो माहिती अधिकार अर्जासंदर्भात माहिती देण्यासाठी अपीलकर्त्याकडे गेला तेव्हा आरोपीने त्याच्या धर्माचा उल्लेख करून त्याच्याशी गैरवर्तन केले आणि सरकारी कामकाजात अडथळा आणण्यासाठी गुन्हेगारी बळाचा वापर केला.