
एखाद्याला मियां-तियां किंवा पाकिस्तानी म्हणणे चुकीचे असू शकते, परंतु हा गुन्हा नाही, असे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने एका 80 वर्षीय वृद्धाविरोधात दाखल करण्यात आलेला खटला फेटाळून लावला. कलम 298 अंतर्गत एखाद्याला पाकिस्तानी म्हणणे भावनिक भावना दुखावणाऱ्या गुह्याच्या कक्षेत मोडत नाही, असे न्यायालयाने नमूद केले.
झारखंडमधील बोकारो जिह्यातील 80 वर्षीय हरी नंदन सिंह यांच्यावर उर्दू भाषांतरकार आणि झारखंडच्या छास येथील उपविभागीय कार्यालयात आरटीआय क्लर्क म्हणून काम करणाऱ्या शमीमुद्दीन मोहम्मद यांनी हल्ला केला. शमीमुद्दीन यांनी त्यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप केला. हरी नंदन सिंह मला मियां-तियां आणि पाकिस्तानी म्हणाले, त्यांच्या अशा बोलण्याने माझ्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप त्यांनी केला.
नेमके प्रकरण काय…
हरी नंदन सिंह यांनी आरटीआय कायद्या अंतर्गत बोकारो येथील अतिरिक्त जिल्हाधिकाऱयांकडे एका विषयाबाबतची माहिती मागितली होती. याबाबतची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली होती. परंतु कागदपत्रे घेण्यास हरी नंदन सिंह यांनी नकार दिला. तसेच कागदपत्रांशी छेडछेडा केल्याचा आरोप केला. त्यानंतर शमीमुद्दीन स्वतः आपल्या सहाय्यकासोबत कागदपत्रे घेऊन हरी नंदन सिंह यांच्या घरी गेले. त्यावेळीही त्यांनी कागदपत्रे घेण्यास नकार दिला. विनवणीनंतर त्यांनी कागदपत्रे घेतली परंतु त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल संशय घेत त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला, असा आरोप शमीमुद्दीन यांनी आपल्या तक्रारीत केला होता.